प्रतिगामी उदयनराजे आणि पुरोगामी फडणवीस !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतिगामी उदयनराजे आणि पुरोगामी फडणवीस !

    मराठा नसूनही मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठे कार्य केले, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

ओबीसींचा सौदागर भुजबळांनी बाज यावे ! 
सरकारला निर्णयाचे स्वातंत्र्य असावेच!
गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्यच!

    मराठा नसूनही मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठे कार्य केले, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली आहे. त्यांनी केलेली ही प्रशंसा अतिशय वास्तव असून त्या संदर्भात काहीही मतभेद व्यक्त करण्याचे कारण नाही. देवेंद्र फडणवीस हे नुसते राजकारण करीत नसून एक सत्ताधारी म्हणून जे जे काही प्रयत्न करायचे असतात ते प्रयत्न करण्याची त्यांची तडफ महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही सत्ताधारी व्यक्ती पेक्षा अधिक प्रभावी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार बनताच त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातही थेट सर्वोच्च न्यायालयात बांठिया आयोगाचा अहवाल सादर केला आणि त्या पाठोपाठ त्यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असणारी लगबग त्याच तडफेने सुरू केली. अर्थात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण देता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी त्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी याचिकाही शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. हीदेखील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने फार महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशंसेत उदयनराजे यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी आपल्याला मान्य करता येतील; तर काही बाबीत त्यांच्याशी निश्चितपणे मतभेद असतील. त्यांनी सर्वात महत्त्वाचा जो विषय सांगितला की मराठा समाजाचे अनेक नेते – मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले; परंतु, त्यांना मराठा आरक्षण लागू करता आले नाही आणि त्यासाठी त्यांना योग्य दिशेने प्रयत्नही करता आले नाही. या बाबीवर त्यांनी अतिशय परखड अशी भूमिका मांडली. मात्र त्याचवेळी त्यांनी केवळ मागासवर्गीयांना आरक्षण देऊ नये,  जातीच्या आधारावर न देता सर्व जातीतील दुर्बल घटकांना सवलती देण्याची त्यांची जी मागणी आहे, ती मागणी सामाजिक रचना त्यांना म्हणजे उदयनराजेना अजूनही कळली नाही, याचे द्योतक आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतानाही आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणासाठी आणि ओबीसी आरक्षणासाठी त्यांच्याकडून शक्य होतील तेवढे सर्व प्रयत्न त्यांनी केले. मात्र, त्यासंदर्भात त्यांनी कुठेही हे आरक्षण जातीच्या आधारावर न देता त्या जातीतील दुर्बल वर्गांना द्यावं, असे कधीही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची सामाजिक जाण निश्चितपणे उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा खूप मोठी आहे आणि वास्तवही आहे, ही बाब आपल्यासमोर अधोरेखित होते. अर्थात उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांची लिगॅसी प्राप्त आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी त्यांचे वैचारिक साधर्म्य महाराष्ट्राला कधीच जाणवले नाही. जैविक वारसा जितका महत्त्वाचा तितकाच वैचारिक वारसा देखील महत्त्वाचा ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेच्या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व जातीसमुहांना आपल्या राज्यव्यवस्थेत प्रमुख स्थान दिले. त्यांनी निश्चितपणे कुठेही जातीभेद केला नाही.  त्यांच्या विचारांमध्ये समतेचे अधिष्ठान कायम राहिले आहे. त्या विशाल आणि समतायुक्त विचारांशी विरोधाभासी विचार हे उदयनराजे भोसले वेळोवेळी मांडत असतात. सध्याचे राज्यकर्ते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत असताना एक गोष्ट निश्चित जाणवते की सत्ता संचलित करताना ते देखील जातीभेद करीत नाही. सर्व जातीसमूहांना सामावून घेण्याची त्यांची पद्धत आहे. आपण पाहिले तर त्यांच्या मंत्रिमंडळात ओबीसी समुदायालाही न्याय मिळतो. प्रशासन चालवताना पण पाहिले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागासवर्गीय (बौद्ध) अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या बाहेर म्हणजे घरी बसवण्यात आले. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी असा प्रकार केव्हाच केला नाही. ते मुख्यमंत्री असताना श्याम तागडे आणि डॉ. संजय चहांदे या बौद्ध आय‌एएस अधिकाऱ्यांना अनुक्रमे प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव दर्जा देऊन चांगल्या विभागात नियुक्त्या होत्या. महाविकास आघाडीने या दोन्ही अधिकाऱ्यांना थेट घरी बसवले होते. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांचा व्यवहार अतिशय समतामूलक आहे, यात वादच नाही! त्यांचा हा व्यवहार पुरोगामी आहे. हे पुरोगामीत्व सर्वसमावेशक आहे.

COMMENTS