Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली-मिरजेला गारपिटीचा तडाखा

सांगली : गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअस तापमानामुळे होरपळून निघालेल्या सांगली जिल्ह्याला आज निसर्गाच्या दोन टोकाच्या रूपांचा अनुभव आला.

अवकाळी पावसाने नांदेड शहराला झोडपले; रस्ते जलमय, होर्डिंग्ज कोसळली, वीजपुरवठा खंडित
वादळग्रस्त नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : आ. काळे
बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ‘सरडा’ म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टा!सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? – डॉ. गणेश ढवळे

सांगली : गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअस तापमानामुळे होरपळून निघालेल्या सांगली जिल्ह्याला आज निसर्गाच्या दोन टोकाच्या रूपांचा अनुभव आला. सायंकाळच्या सुमारास मिरज शहरासह परिसरात वादळी वारा, गारपीट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले.
दिवसभर प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना सायंकाळी अचानक वातावरणात बदल जाणवला. सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाचा जोर इतका वाढला की मिरज शहरातील अनेक रस्त्यांवर अल्पावधीतच पाणी साचले. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. परिणामी, मिरज तालुक्यातील अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत अंधाराचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मिरज शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे द्राक्ष बागा, भाजीपाला तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच कडाक्याच्या उन्हाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसामुळे नवे संकट उभे ठाकले आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे सायंकाळच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. एकूणच, उकाड्यातून दिलासा देणारा पाऊस असला तरी त्याने नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत.

COMMENTS