सांगली : सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. लग्नासाठी पाहुणे म्हणून आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. वडिला

सांगली : सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. लग्नासाठी पाहुणे म्हणून आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. वडिलांना नदीत बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतलेल्या २० वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये ही घटना घडली. येथे एका लग्न समारंभासाठी मुंबई आणि कोरेगाव येथून पाहुणे आले होते. लग्नाचा सोहळा सुरू असतानाच काही लहान मुलं आणि त्यांचे पालक जवळच असलेल्या येरळा नदीवर पोहण्यासाठी गेले.
मुले पाण्यात खेळत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ८ ते १० मुले खोल प्रवाहात वाहू लागली. हे पाहून काठावर उभ्या असलेल्या पालकांनी आणि इतरांनी त्यांना वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. या गोंधळात सात ते आठ मुले बुडत होती.
यावेळी मुंबईत राहणाऱ्या फिरदोस जाकीर शिकलगार या मुलीने पाहिले की, तिचे वडील सुद्धा मुलांना वाचवताना पाण्यात बुडत आहेत. वडिलांना संकटात पाहून क्षणाचाही विचार न करता फिरदोसने नदीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात फिरदोस स्वतः खोल पाण्यात बुडाली.
नदीकाठावर उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने सात मुलांना सुखरूप बाहेर काढले. फिरदोसलाही बाहेर काढून विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या विशीतील तरुणीचा मृत्यू झाला. इतर तीन ते चार मुलांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एका बाजूला सनई चौघडे वाजत असतानाच, दुसऱ्या बाजूला नदीकाठी घडलेल्या या मृत्यूच्या तांडवामुळे संपूर्ण खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. वडिलांचे प्राण वाचवणारी लेक मात्र जगातून कायमची निघून गेली आहे.

COMMENTS