Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वार्‍यासह अवकाळी पावसाने तलवाडा यात्रेतील कंदुरीवाल्यांचे अतोनात हाल

भाविकांच्या सोयीसुविधेकडे विश्वस्त मंडळाचे मात्र दुर्लक्ष

गेवराई प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवीची यात्रा सध्या सुरू अस

त्र्यंबकेश्‍वरला पंगतीतील भेदाला मूठमाती
नायजर नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 100 जणांचा मृत्यू
चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

गेवराई प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवीची यात्रा सध्या सुरू असून मंगळवारी अचानक आलेल्या वार्‍यासह पावसाने दुरवरून कंदुरीचे कार्यक्रम घेऊन आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. जर अचानक पाऊस पडला तर याठिकाणी कंदुरीचे कार्यक्रम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निवार्‍याची सुविधा उपलब्ध नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांच्या सोयीसुविधेकडे विश्वस्त मंडळ मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तसेच शेकडो वर्षांपासून एक महिना भरणार्‍या या यात्रेसाठी यावर्षी पोलिस अधिक्षकांनी यात्रा बंदोबस्त देखील नाकारल्यामुळे देवीचे दर्शन व नवसापोटी कंदुरीचे कार्यक्रम घेऊन येणार्‍या हजारो भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे एका उंच डोंगरावर भाविकांच्या नवसाला पावणारी श्रीक्षेत्र त्वरितादेवी व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या यात्रा परिसरात आई तुळजाभवानी देवी अशी दोन मंदिरे असून दर्शनासाठी तसेच देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी याठिकाणी हजारो भाविक गर्दी करतात. मंगळवार दि.25 एप्रिल रोजी नवसाची पूर्तता व्हावी म्हणून 96 बोकडाचा बळी देऊन भाविकांनी आपला नवस पूर्ण केला. परंतु दुपारी दोन वाजता अचानक आलेल्या वार्‍यासह पावसाने यात्रेतील व्यावसायिक व कंदुरीचे कार्यक्रम घेऊन आलेल्या भाविकांची चांगलीच दाणादाण उडाली. जर जोरदार पाऊस पडला असता तर मग मात्र ज्या-ज्या ठिकाणी भाविक कंदुरीचा कार्यक्रम करण्यासाठी थांबले होते त्याठिकाणाहून त्यांची वाहने बाहेर देखील काढता आली नसती. परंतु सुदैवाने व देवीच्या कृपेने हि वेळ त्यांच्यावर आली नाही. मोडकळीस आलेली यात्रा पूर्वपदावर आणण्यासाठी यावर्षी गणेश दादा बांगर मित्र मंडळ, युवराज दादा गर्जे, संकेत गर्जे, कृष्णा पवार, शुभम गर्जे, श्रीपाद खुरूद, अनुप थोरात, गणेश जाधव, अशोक धोंगडे, सतीष मोरे,  पत्रकार बापू गाडेकर, हभप गणेश महाराज कचरे, दादाराव रोकडे आदींनी आपापल्या परीने भरीव योगदान व आर्थिक मदत केल्याने यात्रा चांगली भरली आहे. विश्वस्त मंडळाने काहीअंशी आर्थिक मदत केली परंतु यात्रेत येणार्‍या भाविकांना ज्या सोयीसुविधा आवश्यक आहेत त्याकडे मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याचा भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यात्रा काळात दरवर्षी पोलिस मुख्यालय येथून एक महिन्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात येत असतो. परंतु यावर्षी मात्र पोलिस अधिक्षकांनी बंदोबस्त देण्यासाठी नकार दिल्याने भाविकांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कंदुरीचे कार्यक्रम घेऊन येणारे भाविक व दर्शनासाठी येणारे हजारो भाविकांच्या सोयीसुविधांचा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंदुरीचे कार्यक्रम करण्यासाठी निवारा शेड तयार करणे, महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करणे यासह इतर अनेक बाबींकडे विश्वस्त मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने भाविकांची गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे. विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी मंदिर परिसरात तसेच यात्रा परिसराकडे ढुंकूनही पाहत नसल्याने यात्रेतील व्यावसायिक व भाविकांनी आपल्या समस्या कुणाकडे मांडाव्यात असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ना काम के ना काज के दुश्मन अनाज के अशी विदारक अवस्था विश्वस्त मंडळ पदाधिकारी यांची झाली आहे. सध्या यात्रा परिसरात गावातील काही होतकरू मंडळी लक्ष देत असून त्यांच्यामुळे किमान यात्रेतील व्यावसायिक ांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. विश्वस्त मंडळ व ग्रामपंचायत यांना मात्र यात्रेविषयी काही घेणं-देणं नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

COMMENTS