लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील 'कॅप्स कॅफे' (Caps Cafe) परिसरात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. गेल्या वर्षभरातील ही

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’ (Caps Cafe) परिसरात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. गेल्या वर्षभरातील ही चौथी घटना असल्याने तिथल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे परिसरात ही घटना घडली आहे. कपिल शर्माच्या कॅफेजवळील एका रेस्टॉरंटवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे, गेल्या एका वर्षात या परिसरात गोळीबार होण्याची ही चौथी वेळ आहे. या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे तिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गोळीबाराच्या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. टायसन बिश्नोई आणि जोरा सिद्धू या नावाच्या अकाउंटवरून कपिल शर्मा आणि कॅफे मालकाला उघड धमकी देण्यात आली आहे. ‘लाईनीत या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील’, असा इशारा या पोस्टमधून देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या धमकीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या प्रकरणाचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. २०२५ पासून या कॅफेला टार्गेट करण्याचे सत्र सुरू आहे. १० जुलै, ७ ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२५ मध्येही अशाच प्रकारे फायरिंगच्या घटना घडल्या होत्या. सलमान खानला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आमंत्रित केल्याने एक गट नाराज असल्याच्या चर्चाही सध्या रंगत आहेत.
कपिल शर्माने यापूर्वीच तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली होती. कॅनडातील कायद्यांकडे अशा घटना रोखण्याची पुरेशी ताकद नसावी, असे त्याने एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. आता या ताज्या हल्ल्यामुळे कपिल शर्माच्या कॅफेच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. सध्या कॅनडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, यामागे खरोखर बिश्नोई गँगचा हात आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS