तेहरान/वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे एक युद्ध हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांना सुखरूप बाह

तेहरान/वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे एक युद्ध हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
अमेरिकन प्रशासनाच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की इतर कोणते कारण होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. लष्करी अधिकार्यांकडून सविस्तर चौकशी केली जात असून त्याचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिकेची सुरक्षा मोहीम सुरू असून युद्ध हेलिकॉप्टर, मानवरहित विमाने आणि लढाऊ विमानांच्या मदतीने गस्त घातली जात आहे. या भागात लहान सशस्त्र नौका किंवा मानवरहित हल्लेखोर साधनांपासून उद्भवणार्या धोक्यांना रोखण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढली आहे. दोन्ही देशांकडून परस्परांवर हल्ले झाल्याच्या वृत्तांमुळे जागतिक समुदायात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतानेही आपल्या नागरिकांना इराणचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. येमेनमधील हुथी गटाने इस्रायलशी संबंधित जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा दिल्यामुळे लाल समुद्र परिसरातील सागरी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडींमुळे जागतिक तेलबाजारातही अस्थिरता वाढली असून कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.

COMMENTS