महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न संविधानिक चौकट आणि राज्यकर्त्यांच्या निर्णयक्षमतेशी जोडलेला प्रश्न बनला आहे. त्यामुळे या प्रश्ना

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न संविधानिक चौकट आणि राज्यकर्त्यांच्या निर्णयक्षमतेशी जोडलेला प्रश्न बनला आहे. त्यामुळे या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकार जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्या आंदोलनाची भाषा, पद्धत आणि नेतृत्वाची जबाबदारीही महत्त्वाची आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न आक्रमकपणे आणला, यात शंका नाही. त्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजातील मोठा असंतोष संघटित स्वरूपात व्यक्त झाला. सरकारवर दबाव निर्माण झाला. राजकीय पक्षांना या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. या अर्थाने त्यांच्या आंदोलनाचे राजकीय आणि सामाजिक महत्त्व नाकारता येणार नाही. पण आंदोलनाला मिळालेली लोकप्रियता आणि नेतृत्वाला मिळालेला जनाधार याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही नेत्याबद्दल काहीही बोलण्याचा परवाना मिळतो, असा होत नाही. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अपशब्द वापरणे, वैयक्तिक आरोप करणे किंवा धमकीच्या भाषेत राजकीय संवाद साधणे हा मराठा आरक्षणाच्या मूळ प्रश्नालाच दुय्यम ठरवणारा प्रकार आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एवढी मोठी झळाळी मिळण्यात सरकारच्या भूमिकेचा काहीही संबंध नाही, असे म्हणणे वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणे ठरेल. जरांगे यांच्या आंदोलनाला सरकारने प्रत्येक वेळी दडपशाहीच्या मार्गाने उत्तर दिले असते, आंदोलकांशी संवादच नाकारला असता किंवा आंदोलनाला सुरुवातीपासूनच केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानले असते, तर आजचे चित्र वेगळे असते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध टप्प्यांवर आंदोलनाशी संवाद साधला, चर्चेचे मार्ग खुले ठेवले आणि मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. २०२६ मध्येही सरकार आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली; त्यानंतर सरकारच्या भूमिकेबाबत फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी मार्ग काढण्याची भूमिका मांडली. याचा अर्थ सरकारने जरांगे यांच्या प्रत्येक मागणीला मान्यता दिली असा अजिबात नाही. एवढे मात्र म्हणता येईल की, आंदोलनाला लोकशाही चौकटीत जागा मिळणे आणि सरकारने संवादाचा मार्ग खुला ठेवणे यामुळेच आंदोलनाला व्यापक सामाजिक-राजकीय दृश्यता मिळाली.
म्हणूनच आज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर अपशब्द वापरले, तर तो केवळ एका व्यक्तीचा अपमान राहत नाही; तो त्यांनी ज्या लोकशाही प्रक्रियेतून स्वतःचे नेतृत्व उभे केले, त्या प्रक्रियेच्या मर्यादांनाही धक्का देतो.
आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर महाराष्ट्र बंद’, अमुक नेत्याचा राजकीय पराभव करू, अमुक व्यक्तीला जबाबदार धरू’ अशा प्रकारची भाषा आंदोलनाची नैतिक उंची कमी करते. सरकारला घाबरवून मागणी मान्य करून घेणे आणि संविधानिक प्रक्रियेतून न्याय मिळवणे यात मूलभूत फरक आहे.जरांगे पाटील यांनी हा फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जनसमर्थनाचे रूपांतर व्यक्तिकेंद्री राजकीय शक्तीत झाले, तर आंदोलन आणि व्यक्ती यांच्यातील सीमारेषा पुसली जाऊ शकते. आणि ही कोणत्याही सामाजिक चळवळीच्या भविष्यासाठी धोकादायक गोष्ट असते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या निर्णयांवर प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा भाग आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी काय केले, काय केले नाही, कोणते आश्वासन दिले, कोणते निर्णय न्यायालयीन कसोटीवर टिकतील, कोणते निर्णय प्रत्यक्षात आले नाहीत. या सर्वांचा कठोर हिशेब मागितला पाहिजे. पण हा हिशेब तथ्यांच्या भाषेत मागितला पाहिजे.
पण व्यक्तिगत अपमान, अपशब्द, धमकी, व्यक्तिगत वैर
हे आंदोलनाला ताकद देत नाही. उलट आंदोलनाच्या नैतिक भूमिकेला कमकुवत करते.
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नेतृत्व म्हणजे केवळ आक्रमकता नव्हे; तर संयम, रणनीती, दूरदृष्टी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारला; पण तो संघर्ष संविधानिक मूल्यांशी जोडला. आंदोलन आणि संविधान, संघर्ष आणि कायदा, असंतोष आणि संस्थात्मक प्रक्रिया, यांचा संबंध तोडला नाही. जरांगे पाटील यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्यावर टीका करणारा प्रत्येक माणूस मराठा आरक्षणाचा विरोधक नाही आणि फडणवीस यांच्याशी संवाद साधणारा प्रत्येक माणूस जरांगेविरोधक नाही.


COMMENTS