पाटणा : गोळीबार प्रकरणात अडकलेल्या प्रसिद्ध अध्यापन संस्थेचे संचालक खान सर यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनाव

पाटणा : गोळीबार प्रकरणात अडकलेल्या प्रसिद्ध अध्यापन संस्थेचे संचालक खान सर यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान पाटणा येथील दिवाणी न्यायालयाने अटकेवर अंतरिम स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी किंवा नव्या आदेशापर्यंत संबंधित व्यक्तीविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खान सर यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न तसेच शस्त्रांच्या कथित गैरवापरासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला.
याच प्रकरणात अटकेत असलेल्या खान सर यांच्या दोन सुरक्षा रक्षकांच्या जामीन अर्जावरही सुनावणी झाली. दीपक कुमार आणि तालेबर सिंह या दोघांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यात आली. सुनावणीनंतर न्यायालयाने पोलिसांकडून उपलब्ध पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले असून त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णयही लवकरच अपेक्षित आहे. या दोन्ही सुरक्षा रक्षकांना 4 जून रोजी अटक करण्यात आली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांच्यावरील निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुरक्षा रक्षकांच्या जबाबाच्या आधारे खान सर यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रथम माहिती अहवालात काही गंभीर आरोपांचा उल्लेख करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे.

COMMENTS