नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेच्या प्रारंभीच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाल्याने यात्रेवर दु:खाची छाया पसरली

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेच्या प्रारंभीच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाल्याने यात्रेवर दु:खाची छाया पसरली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री धामकडे जाणार्या पायी मार्गावर ही दोन्ही दुर्घटना घडल्या. उंच डोंगराळ भागातील प्रतिकूल परिस्थिती आणि आरोग्याच्या अडचणी यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
पहिल्या घटनेत महाराष्ट्रातील नाशिक येथील 67 वर्षीय उदम तांबे यांचा मृत्यू झाला. ते आपल्या सहप्रवाशांसह यमुनोत्री धामच्या दर्शनासाठी निघाले होते. पायी मार्गाने चढाई करत असताना जानकीचट्टी परिसरात अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेण्यास तीव्र त्रास जाणवू लागला. तातडीने त्यांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत उंच भागातील ऑक्सिजनची कमतरता तसेच पूर्वीपासून असलेला रक्तदाबाचा त्रास हे मृत्यूचे संभाव्य कारण मानले जात आहे. दुसर्या घटनेत मध्य प्रदेशातील इंदूर येथील 40 वर्षीय प्रतिमा मिश्रा या महिला भाविकांचा मृत्यू झाला. त्या आपल्या पतीसोबत यात्रेसाठी आल्या होत्या. यमुनोत्रीच्या मार्गावरील ‘19 कँची’ या ठिकाणी त्या घोड्यावरून प्रवास करत असताना घोड्याचा तोल गेल्याने त्या खाली कोसळल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. या दोन्ही घटनांनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. आवश्यक कार्यवाही पूर्ण करून दोन्ही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. संबंधित अधिकार्यांनी सांगितले की, यात्रेदरम्यान आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. चारधाम यात्रेचा प्रारंभ रविवारी झाला असून गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे विधिवत उघडण्यात आले. हिवाळ्यात बंद असलेले हे धाम पुन्हा भाविकांसाठी खुले झाल्याने मोठ्या संख्येने यात्रेकरू उत्तराखंडकडे दाखल होत आहेत.
उंचावर जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी आवश्यक
प्रशासनाने भाविकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उंच आणि दुर्गम भागात जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी करून घेणे, श्वसनविकार, दमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे, प्रवासादरम्यान घाई टाळणे आणि आवश्यक त्या ठिकाणी विश्रांती घेणे, यावर भर देण्यात आला आहे. शरीराला उंच भागातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडणार
यात्रेचा पुढील टप्पा म्हणून केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिल रोजी सकाळी उघडण्यात येणार आहेत. यंदा ही यात्रा मागील वर्षाच्या तुलनेत लवकर सुरू होत असल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन अधिक सतर्क असून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे.

COMMENTS