Homeताज्या बातम्या

नाशिकच्या खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संतापकुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांवर खोदकाम

नाशिक : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढणारे अपघात आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेला धोका यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र

चालकाला फिट आल्याने थेट गॅरेज मध्ये घुसली कार
भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर कारला जोरदार धडक, दीड वर्षाची चिमुकली सुखरूप!
अवजड वाहनाच्या धडकेने ट्रान्सफॉर्मर जळून खाक; राहुरीत तीन दिवस अंधार; गुन्हा नोंद न झाल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नाशिकच्या खड्ड्यांवरून छगन भुजबळ आक्रमक; कुंभमेळ्याच्या कामांवरून अधिकाऱ्यांना फटकारले


नाशिक : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढणारे अपघात आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेला धोका यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसेच मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचा इशारा दिला.
भुजबळ म्हणाले की, नाशिकमधील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, वाहतूककोंडी वाढते आणि अपघातांची शक्यता निर्माण होते. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या प्रश्‍नाकडे संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. एका कार्यक्रमासाठी शहरात प्रवास करताना स्वतःला रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था अनुभवायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील जनप्रतिनिधी आणि प्रशासनही या परिस्थितीमुळे त्रस्त असल्याचे नमूद करत, शहराला वार्‍यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत भुजबळ म्हणाले की, पावसाचा जोर कमी होताच तातडीने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घ्यावी. पुन्हा खड्डे पडले तरी ते पुन्हा भरावेत; मात्र नागरिकांचे जीव धोक्यात येऊ देऊ नयेत. दुहेरी काम करावे लागले तरी त्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघातात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी, अशाच प्रकारे खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्या इतर नागरिकांच्या कुटुंबांनाही समान न्याय मिळायला हवा, अशी मागणी केली.
आगामी कुंभपर्वाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रश्‍नात लक्ष घालावे, असे आवाहन केले. जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यापेक्षा संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. महानगरपालिकेवर रस्ते, पाणीपुरवठा आणि बांधकाम यांसारख्या मूलभूत सुविधांची जबाबदारी असल्याचे नमूद करत भुजबळ यांनी अधिकार्‍यांनी केवळ कार्यालयात बसून न राहता प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्‍न सोडवावेत, असेही सांगितले. नाशिकची प्रतिमा मलिन होणार नाही, यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS