श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात किमान 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आह

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात किमान 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. रामनगर परिसरातील कागोट गावाजवळ एका प्रवासी बसचा ताबा सुटून ती खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
अधिकृत माहितीनुसार, दुर्गम भागातून उधमपूरकडे येत असलेली ही बस सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास कागोट परिसरातील तीव्र वळणावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्यापासून सुमारे शंभर फूट खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसचा वरचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये शासकीय कर्मचारी, शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मिळून जखमींना बाहेर काढले व जवळील रुग्णालयात हलवले. जखमींवर उधमपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जखमी प्रवाशांच्या कथनानुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते आणि वाहन वेगाने धावत होते. कागोट नाल्याजवळ अचानक एका टायरचा स्फोट झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. गंभीर जखमींना तातडीने हवाई मार्गाने हलवण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मदतकार्यावर सतत लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने अपघातग्रस्त भागात सतर्कता वाढवली असून, डोंगराळ भागातील रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

COMMENTS