श्रीगोंदा : शहरातील सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अत्यंत गैरसोयीच्या आणि धोकादायक परिस्थितीत शिक्षण घ्याव

श्रीगोंदा : शहरातील सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अत्यंत गैरसोयीच्या आणि धोकादायक परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेला स्वतंत्र अंगणवाडीची इमारत नसल्याने अनेक वर्षांपासून तात्पुरत्या जागांमध्ये शिक्षण सुरू ठेवले जात आहे. सध्या तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली बसून शिक्षण घ्यावे लागत असून, यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्वी समाजमंदिराच्या किचन रूममध्ये अंगणवाडी भरविण्यात येत होती. मात्र ती खोली पूर्णपणे जीर्ण झाल्यानंतर तिसरीचा वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनातील नव्याने बांधलेल्या किचन रूममध्ये हलविण्यात आला. परंतु ही खोलीही विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने अपुरी असून पावसाळ्यात छत गळत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचचीही व्यवस्था नसल्याने लहान मुलांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. पावसाचे पाणी वर्गात ठिबकत असल्यामुळे अध्यापनात वारंवार व्यत्यय येत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित शिक्षकांनी स्वतः कागदी तळवट आणून पत्र्यावर टाकत तात्पुरती उपाययोजना केली. मात्र ही व्यवस्था कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय वर्गखोलीच्या एका कोपऱ्यातील भिंतीचा भाग उखडलेल्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक धोकादायक बनत असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल पालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिक्षणाचा मूलभूत हक्क असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरणात शिक्षण मिळणे आवश्यक असताना त्यांना अशा परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वर्गखोलीची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शाळेला अनेक वर्षांपासून स्वतंत्र अंगणवाडीची इमारत नसल्याने ही समस्या कायम आहे. त्यामुळे या शाळेस स्वतंत्र अंगणवाडीची इमारत, विज्ञान प्रयोगशाळा आणि तिसरीच्या वर्गासाठी स्वतंत्र वर्गखोली अशा एकूण तीन नवीन खोल्या तातडीने मंजूर करून बांधण्यात याव्यात, अशी मागणी पालक, स्थानिक नागरिक आणि शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नाकडे प्रशासनाने आणखी दुर्लक्ष न करता तातडीने निधी उपलब्ध करून आवश्यक बांधकामे पूर्ण करावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांना भीतीमुक्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण मिळू शकेल.
१ मार्च २०२६ रोजी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांना या शाळेसाठी नवीन वर्गखोल्यांचा प्रस्ताव दिला आहे. विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिद्धार्थनगर येथील या शाळेस स्वतंत्र अंगणवाडी, प्रयोगशाळा आणि तिसरीच्या वर्गासाठी अशा तीन खोल्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंद घोडके यांनी केली आहे.

COMMENTS