Homeताज्या बातम्या

गोदावरीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह वाळू जप्त

कोपरगाव शहर : धारणगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून शासकीय वाळूची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक

विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान नांदेड जिल्हा दौर्‍यावर; किनवटसह विविध विभागांचा घेणार झाडाझडती
एसटी प्रवास सवलतीच्या परताव्याची होणार सखोल तपासणी; परिवहन विभागाचे ऑडिटचे स्पष्ट निर्देश
‘गुंगी गुडीया’ वक्तव्याचे राज्यभरात पडसाद

कोपरगाव शहर : धारणगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून शासकीय वाळूची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह वाळू जप्त केली असून, संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हे पथकासह गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत धारणगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने धारणगाव शिवारात जाऊन शोधमोहीम सुरू केली. यावेळी गणेश नाईकवाडे (रा. धारणगाव, ता. कोपरगाव) हा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये गोदावरी नदीपात्रातून शासकीय वाळूची चोरी करून वाहतूक करताना आढळून आला. पोलिस आल्याचे पाहताच त्याने ट्रॅक्टर ट्रॉली सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र तो झाडाझुडपांचा फायदा घेत पसार झाला.

पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच त्यामधील एक ब्रास शासकीय वाळू असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस नाईक राम खारतोडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक कारखले, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे, चालक पोलीस कॉन्स्टेबल फाळके व पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख यांच्या पथकाने केली.

COMMENTS