मुंबई : नाशिक शहरात गाजत असलेल्या कथित धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित म्हणून समोर आलेली निदा एजाज खान ही अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही.

मुंबई : नाशिक शहरात गाजत असलेल्या कथित धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित म्हणून समोर आलेली निदा एजाज खान ही अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून ती फरार असून, पोलिसांना सतत चकवा देत असल्याची माहिती आहे. दरम्यान, ती गर्भवती असल्याचा दावा पुढे आल्याने या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी अपेक्षित असल्याने, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. ती वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याचे समोर येत असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. तांत्रिक साधनांच्या मदतीने तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, लवकरच तिला अटक करण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात काही तरुणींना लक्ष्य करून त्यांच्यावर मानसिक प्रभाव टाकत धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा संशय आहे. यासाठी ठरावीक पद्धतीचा वापर करण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाबाबत समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, यामागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला एका खासगी संस्थेत जबाबदारीच्या पदावर कार्यरत होती. नव्याने रुजू होणार्या महिला कर्मचार्यांशी संपर्क साधून त्यांना प्रशिक्षणाच्या निमित्ताने जवळ केले जात असल्याचा आरोप आहे. बैठकीदरम्यान मानसिक दबाव निर्माण करून त्यांना विशिष्ट दिशेने वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत तिची भूमिका महत्त्वाची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात यापूर्वी काही संशयितांना अटक करण्यात आली असून, चौकशीदरम्यान मुख्य सूत्रधाराबाबत महत्त्वाची माहिती उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आर्थिक व्यवहारांचा कोनही तपासात समोर येत असून, यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS