Homeताज्या बातम्या

किनवट बाजार समितीत कोट्यवधींचा घोटाळा; सचिव रवींद्र राठोड यांच्या निलंबनाचे ‘पणन संचालकांचे’ थेट आदेश!

किनवट: कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट येथील गैरव्यवहार, आर्थिक अपहार आणि नियमबाह्य कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. राज्य शासनाच्या पणन संचालनालयान

मेळघातात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार; अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बालिकेच्या पोटावर दिले चटके!
नीट आंदोलनामुळे मुंबईत कठोर निर्बंध; ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी, परवानगीशिवाय मोर्चा किंवा आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा
भारतासाठी चिंताजनक बातमी! अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनकडून भारतीय जमिनीवर कब्जा; स्थानिक आदिवासींचा धक्कादायक दावा
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय नाट्य! अविश्वास प्रस्तावाला उच्च  न्यायालयाची स्थगिती मिळताच १४ संचालकांचे सामूहिक राजीनाम्याचे ...

किनवट: कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट येथील गैरव्यवहार, आर्थिक अपहार आणि नियमबाह्य कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. राज्य शासनाच्या पणन संचालनालयाने (पुणे) या गंभीर प्रकरणाची दखल घेत बाजार समितीचे सचिव रवींद्र शामराव राठोड यांना तातडीने निलंबित करून त्यांची चौकशी करण्याचे तसेच त्यांचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार काढून घेण्याचे सणसणीत आदेश जारी केले आहेत.

पणन संचालक शरद जरे यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम 1963 मधील कलम 40 (ई) व नियम 102 मधील तरतुदीनुसार हे कठोर निर्देश दिले आहेत. उपसभापती राहुल गेमसिंग नाईक (जाधव) यांच्यासह 15 ते 16 संचालकांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच पणन संचालकांकडे किनवट बाजार समितीतील गैरव्यवहाराबाबत पुराव्यानिशी तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, नांदेड) यांच्या अहवालानंतर आणि तालुकास्तरीय दक्षता पथकाच्या चौकशीअंती या गैरव्यवहारांवर शिक्कामोर्तब झाले.

सन 2025-26 च्या हंगामात सुमारे 32 शेतकऱ्यांचे 632 क्विंटल सोयाबीन खरेदी करून बाजारात परस्पर विक्री केली व फसवणूक केली. याशिवाय, 54 शेतकऱ्यांचे 1073 क्विंटल सोयाबीन परत केल्याच्या प्रकरणात शासकीय गोदामात जमा करण्याचे कर्तव्य न बजावता शासकीय नियमांचे उल्लंघन केले, बाजार समितीच्या जमीन विक्रीतून मिळालेली रु. 1.61 कोटी (ॲक्सिस बँक) आणि रु. 92.36 लाख (कॅनरा बँक) अशी एकूण रु. 2 कोटी 52 लाख 86,675/- (2.52 कोटी) ची रक्कम मुदत ठेवीत होती. ही रक्कम बेकायदेशीरपणे उचलून तिचा खाजगी कामासाठी उपयोग करण्यात आला. बाजार समितीची महत्त्वाची व गोपनीय शासकीय कागदपत्रे कार्यालयात न ठेवता बेकायदेशीररीत्या स्वतःच्या घरी नेऊन त्यांचा मनमर्जीप्रमाणे गैरवापर केला.

बाजार समितीला कोणताही अधिकृत बाजार शुल्क न देता, विनापरवाना अंदाजे रु. 18 लाख रकमेची परस्पर उचल करून समितीचे मोठे नुकसान केले. कार्यक्षेत्रात अधिकृत पावती न देता, अंदाजे 15 ते 25 लाख रुपयांची रोख वसुली बेकायदेशीररीत्या केली. कोठारी व चिखली फाटा येथील कापूस खरेदी केंद्रांवर पावती न देता लाखों रुपयांचा महसूल बुडवला, बाजार समितीच्या लागणाऱ्या किर्दीच्या नावाखाली बोगस व बनावट पावत्या जोड़ून लाखों रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला.

पणन संचालकांच्या आदेशानंतर किनवट बाजार समितीत प्रचंड खळबळ उडाली आहे. संचालकांच्या निर्देशानुसार, दि. 8 ऑगस्ट 2026 (शनिवार) रोजी सकाळी 11:00 वाजता उपसभापती राहुल गेमसिंग नाईक (जाधव) यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची तातडीची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेपुढील मुख्य विषय म्हणजे पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्र क्र. 24/कृउबासं/किनवट/40 ई/प्रशा/कारवाई/26/3139 (दि. 03/08/2026) च्या आदेशानुसार सचिव रवींद्र शामराव राठोड यांना तातडीने निलंबित करण्याचा ठराव मंजूर करणे, त्यांच्याविरुद्ध चौकशीची कारवाई विनाविलंब सुरू करणे, त्यांचे सर्व आर्थिक व प्रशासकीय अधिकार काढून घेणे असा आहे.

पणन संचालकांनी आपल्या आदेशात स्पष्ट इशारा दिला आहे की, या निर्देशांचे पालन 8 दिवसांच्या आत न केल्यास, जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती व्यवस्थापनावर (संचालक मंडळावर) अधिनियम 1963 च्या कलम 45 अनुसार थेट बरखास्ती किंवा इतर कडक प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी. या कारवाईमुळे किनवट तालुक्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले असून, आता संचालक मंडळ 8 तारखेच्या सभेत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS