मुंबई : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची दिशा अधिक गंभीर बनत असून, नव्या घडामोडींनी या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे चित्र आहे.

मुंबई : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची दिशा अधिक गंभीर बनत असून, नव्या घडामोडींनी या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे चित्र आहे. विशेष तपास पथकाच्या चौकशीत महिलांच्या शोषणानंतर त्यांच्या गर्भपातासाठी काही वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या शक्यतेमुळे केवळ गुन्हेगारी अंगच नव्हे, तर आरोग्य व्यवस्थेतील काही घटकांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करत महिलांचा विश्वास संपादन केला. वैयक्तिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले जात होते. त्यानंतर लैंगिक शोषण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एका पीडित महिलेच्या गर्भधारणेचा मुद्दा पुढे आल्याने तपास अधिक खोलात गेला. गर्भपाताच्या प्रक्रियेबाबत तपास सुरू असताना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही वैद्यकीय व्यावसायिक आणि सोनोग्राफी केंद्रांशी आरोपीचे संबंध असल्याचा संशय तपासात व्यक्त होत आहे. गर्भपातासाठी लागणारी औषधे नियमबाह्य मार्गाने उपलब्ध करून देण्यात आली का, तसेच या प्रक्रियेत वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाले का, याची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच, महानगरपालिकेशी संबंधित एका डॉक्टराचा या प्रकरणाशी संभाव्य संबंध तपासात समोर आला असल्याचे कळते. संबंधित व्यक्ती आरोपीच्या संपर्कात होती का आणि काही प्रकरणांमध्ये मदत केली का, याचा तपास केला जात आहे. काही खासगी तपासणी केंद्रांमध्ये पीडित महिलांच्या तपासणीतून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, हेदेखील तपासाच्या कक्षेत आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपीची पत्नी कल्पना खरात हिच्याविरुद्धही कारवाई सुरू असून, जमीन व्यवहारातील कथित फसवणुकीच्या गुन्ह्यात तिचा समावेश आहे. ती सध्या फरार असल्याची माहिती मिळत आहे. अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने तिच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले असून, संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा पुरावे गोळा करण्यावर भर देत असून, आगामी काळात आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS