मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या सहर शेख यांच्याविरोधात बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा गं

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या सहर शेख यांच्याविरोधात बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून, त्यांच्या नगरसेवकपदावर संकट निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, पुढील कारवाईकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जानेवारी 2026 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत सहर शेख यांनी विजय मिळवत स्थानिक राजकारणात प्रभावी प्रवेश केला होता. त्यांच्या आक्रमक प्रचारशैलीमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, आता निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तक्रारीनुसार, सहर शेख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवले. हे प्रमाणपत्र मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासाठी त्यांच्या वडिलांनी चुकीचा नमुना वापरून अधिकार्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. स्थलांतरितांसाठी वेगळा नमुना लागू असताना दुसर्या नमुन्याचा वापर केल्याने प्रकरण संशयास्पद ठरले आहे. या संदर्भात सिद्दीकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार झालेल्या सुनावणीत सादर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्याचे समोर आले. 18 मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी सहर शेख यांचे वडील अनुपस्थित होते, तर त्यांच्या वकिलांकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर 23 मार्चच्या पुढील सुनावणीत तहसीलदारांनी प्रमाणपत्रातील विसंगतींकडे लक्ष वेधले. याशिवाय, सहर शेख या ठाण्यातील रहिवासी असताना त्यांनी मुंबई शहरातून जात प्रमाणपत्र का घेतले, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी होत असून, सखोल चौकशीची प्रक्रिया सुरू आहे.

COMMENTS