Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपाच्या घरातच धुमसतेय कलहाग्नी; नांदेड-परभणीतील गटयुद्धावर प्रदेश नेतृत्व सतर्क

नांदेड : मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत वाढत्या अंतर्गत कलहाने आता गंभीर स्वरूप धारण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आ

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणे बदलतायत;भाजप-काँग्रेस-शिवसेना ‘ऑन मोड’, राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस
बॅनरवरूनच ‘गटबाजी’चे संकेत?नगरसेविका मीनल पाटील यांची राजकीय भूमिका चर्चेत
बसवेश्वर जयंतीच्या बॅनरमधून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर ; परशुराम जयंतीकडे मात्र काही नेत्यांचा कानाडोळा ?
भारतीय जनता पार्टी - विकिपीडिया

नांदेड : मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत वाढत्या अंतर्गत कलहाने आता गंभीर स्वरूप धारण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः नांदेड आणि परभणी या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांतील गटबाजीने उघड संघर्षाचे रूप घेतल्याने प्रदेश नेतृत्वाने या घडामोडींवर करडी नजर ठेवली असल्याची माहिती पुढे येत आहे.
नांदेडमध्ये पक्षाच्या स्थानिक पातळीवर दोन स्वतंत्र शक्तिकेंद्रे निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. एका गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना दुसर्‍या गटाची सातत्याने अनुपस्थिती दिसून येत असल्याने मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. पक्षविस्तार, जनसंपर्क आणि संघटन मजबुतीपेक्षा अंतर्गत वर्चस्व सिद्ध करण्याच्या राजकारणालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची नाराजी तळागाळातील कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. काही स्वयंघोषित राज्यस्तरीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातील तणाव वाढल्याची चर्चा आहे. मुंबईतील बैठकीत एका नेत्याने नगरसेवकाला तुला उमेदवारी मी मिळवून दिली अशा स्वरातील भाषा वापरल्याने वरिष्ठ नेतेही नाराज झाल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे पक्षातील अंतर्गत शिस्त आणि संवाद प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, परभणीत परिस्थिती अधिकच चिघळल्याचे चित्र आहे. महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आणि बहुसंख्य नगरसेवक यांच्यात थेट संघर्ष उफाळून आल्याची माहिती आहे. पक्षशिस्त भंग, बैठकींकडे दुर्लक्ष, स्थापना दिन, पत्रकार परिषद, प्रशिक्षण शिबिरे आणि संघटनात्मक कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याचे आरोप परस्परांवर होत आहेत. महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवड, स्थायी समितीची रचना आणि विविध प्रशासकीय निर्णय यावरूनही वाद टोकाला गेल्याचे समजते. काही नावांना बहुसंख्य नगरसेवकांनी विरोध दर्शवल्याने निर्णयप्रक्रिया रखडली आहे. परिणामी सत्ताधारी पक्षाचे प्रशासनिक कामकाजच ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, हा वाद केवळ व्यक्तीगत अहंकाराचा नसून संघटनात्मक समन्वय कोसळल्याचे संकेत आहेत. गटबाजी अशीच वाढत राहिल्यास कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, नागरिकांमध्ये नाराजी आणि विरोधकांना संधी अशी तिहेरी हानी भाजपाला सहन करावी लागू शकते. मुंबईतील अलीकडील बैठकीत दोन्ही जिल्ह्यांतील स्थितीवर स्वतंत्र अहवाल मागविण्यात आल्याची चर्चा आहे. आवश्यक असल्यास कठोर संघटनात्मक निर्णय घेतले जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे. एकूणच, विरोधकांशी लढाई करण्यापूर्वी भाजपाला आता स्वतःच्या घरातील धगधगते वादळ शांत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

COMMENTS