नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये अंतर्गत गटबाजीने आता उघड स्वरूप धारण केले असून पक्षातील नेत्यांमध्ये समन्वयापेक्षा वर्चस्वाच

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये अंतर्गत गटबाजीने आता उघड स्वरूप धारण केले असून पक्षातील नेत्यांमध्ये समन्वयापेक्षा वर्चस्वाच्या राजकारणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराचा स्वतंत्र गट निर्माण झाला असून, पक्ष संघटनेपेक्षा वैयक्तिक प्रभाव वाढविण्याच्या स्पर्धेला वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेषतः आ.बालाजी कल्याणकर यांना राजकीयदृष्ट्या एकटे पाडण्याचा प्रयत्न संघटनेतील काही गटांकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात पक्षात वाढत चाललेल्या अंतर्गत संघर्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या प्रश्नांवर लढणारा पक्ष म्हणून ओळख निर्माण करण्याऐवजी स्वतःच्याच नेत्यांना लक्ष्य करण्याची स्पर्धा सुरू झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही स्थानिक नेत्यांना पुढे करून आ.बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. बाळासाहेब देशमुख तरोडेकर आणि गजानन पाटील यांना पुढे करून कल्याणकरांवर अप्रत्यक्ष राजकीय वार केले जात असल्याची चर्चा आहे. पक्षांतर्गत नाराजीचा मुद्दा मुद्दाम वाढवून दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी खा.डॉ. श्रीकांत शिंदे नांदेड दौर्यावर आले असताना झालेल्या आढावा बैठकीतही कल्याणकरांविरोधात तक्रारींचा सूर लावण्यात आला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच जिल्ह्यातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याने संघटनात्मक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. स्थानिक पातळीवरील असंतोष थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यामागे नेमका उद्देश काय, याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दरम्यान, काल उदय सामंत नांदेड येथे आले असताना विमानतळावर स्वागतासाठीआ.हेमंत पाटील यांच्यासह काही स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या स्वागत सोहळ्यातील उपस्थिती आणि अनुपस्थिती यावरूनही पक्षातील गटबाजी पुन्हा अधोरेखित झाली. कोण कुणासोबत उभे आहे आणि कोण कुणाच्या विरोधात मोर्चेबांधणी करत आहे, याचीच चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती. नांदेडमध्ये शिवसेनेचा विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेता पक्षाने एकजूट दाखवणे अपेक्षित असताना नेत्यांतील संघर्षच अधिक ठळकपणे समोर येत आहे. कार्यकर्त्यांना दिशा देण्याऐवजी गटबाजीचे राजकारण वाढल्यास त्याचा फटका आगामी निवडणुकांत बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे विरोधकांशी सामना करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या घरातील नाराजी शमवायची, अशी दुहेरी वेळ नांदेडच्या शिवसेनेवर आली आहे. आता वरिष्ठ नेतृत्व या संघर्षावर लगाम घालणार की गटबाजी आणखी भडकणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS