नांदेड : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणार्या बहुप्रतीक्षित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकल

नांदेड : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणार्या बहुप्रतीक्षित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी आपल्या वाट्याचा 50 टक्के खर्च उचलण्यास कर्नाटकमधील काँग्रेसच्या राज्य सरकारने नकार दिला आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी कर्नाटक राज्य सरकारची ही भूमिका निराशाजनक व दोन्ही राज्यातील जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासणारी असल्याची टीका केली आहे.
नांदेड येथे गुरुवारी पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती’दिशा’च्या बैठकीत रेल्वे विभागाच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीबाबतच्या अहवालातून ही गंभीर बाब उघडकीस आली. नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्राच्या भाजप महायुती सरकारने 5 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या वाट्याचा 50 टक्के खर्च उचलण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारने 27 सप्टेंबर 2024 रोजी या प्रकल्पासाठी आपल्या वाट्याचा 50 टक्के खर्च उचलण्याबाबत नकार अनिच्छा व्यक्त केली आहे. केंद्र तसेच महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या 50:50 टक्के खर्च भागीदारीतून सुमारे 157 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे प्रकल्प राबविण्यास केंद्र सरकाने संमती दिली होती. या प्रकल्पातील सुमारे 101 किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात तर 56 किलोमीटर कर्नाटक राज्यात उभारला जाणार होता. या रेल्वे मार्गामुळे नांदेड येथील श्री हजूर साहिब आणि बिदर येथील श्री नानक झिरा साहिब ही दोन अत्यंत महत्त्वाची शीख तीर्थक्षेत्रे थेट रेल्वे मार्गाने जोडणे शक्य होणार आहे. त्यातून भाविकांना सुविधा तसेच पर्यटन, व्यापार व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार होती. शिवाय नांदेड ते बंगळुरू दरम्यानचे रेल्वे अंतरही लक्षणीयरीत्या कमी झाले असते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा सुरु आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड-बिदर रेल्वे मार्गासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला असून, कर्नाटक सरकारच्या प्रतिकूल भूमिकेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटक सरकारने या प्रकल्पाचा प्रस्ताव नाकारल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा अन्याय असून, याविषयी आपण केंद्राच्या पातळीवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS