Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणाचा सौदा उघड! सरकारी शिक्षक गायब, ‘भाडोत्री’ शिक्षकाकडून चालला वर्ग; किनवट तालुक्यात खळबळ

नांदेड : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही आता ‘ठेका पद्धती’ शिरकाव करत असल्याचा संतापजनक प्रकार किनवट तालुक्यात उघडकीस आला आहे. बेंदी तांडा येथ

किनवटमध्ये 19 मेपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू; आमदार-प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश
किनवटचा कायापालट! पैनगंगा नदीवरील महाकाय बंधारा ’एक्स्प्रेस’ वेगात; पाणीटंचाई होणार इतिहास जमा
महावितरणचा ’स्मार्ट’ संताप: ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने मीटर, अन् अधिकार्‍यांच्या कानाला मात्र ’कुलूप’!

नांदेड : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही आता ‘ठेका पद्धती’ शिरकाव करत असल्याचा संतापजनक प्रकार किनवट तालुक्यात उघडकीस आला आहे. बेंदी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नियुक्त असलेले शिक्षक राम बुसमवार यांनी स्वतः शाळेत उपस्थित राहून अध्यापन करण्याऐवजी, दुसर्‍याच एका खाजगी शिक्षकाला रोजंदारीवर ठेवून वर्ग चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार तब्बल तीन महिन्यांपासून सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेची अक्षरशः लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सरकारी पगार घेत असलेला शिक्षक स्वतः गैरहजर राहतो आणि त्याच्या जागी दुसर्‍याला शिकवण्यासाठी ठेवतो, ही बाब केवळ निष्काळजीपणा नसून शिक्षण व्यवस्थेचा थेट अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. गावचे उपसरपंच चंपत जाधव, ग्रामपंचायत सदस्य आणि संतप्त ग्रामस्थांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता, शिकवणारा व्यक्ती हा राम बुसमवार नसून करीम खान नावाचा खाजगी शिक्षक असल्याचे उघड झाले. तो कोठारी येथील ‘इरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल’मध्ये सहशिक्षक असल्याची कबुलीही त्याने दिली. म्हणजेच एका सरकारी शाळेत खाजगी शिक्षकाकडून बेकायदेशीरपणे अध्यापन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामस्थांनी पुढे हजेरीपट तपासला असता, राम बुसमवार हे जानेवारी 2026 पासून सतत गैरहजर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. तरीदेखील त्यांच्या अनुपस्थितीची कोणतीही गंभीर दखल न घेतल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट किनवट गट शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेत तक्रार दाखल केली. अखेर प्रशासनाला जाग आली असून, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी 20 मार्च रोजी संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, प्रकरणाचा अहवाल नांदेड शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, शाळेचा तात्पुरता पदभार सहशिक्षक शंकर राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात संबंधित खाजगी शाळेलाही नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास कठोर प्रशासकीय कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की, तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे लक्ष का गेले नाही? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्‍या अशा शिक्षकांवर केवळ नोटीस देऊन भागणार आहे का, की थेट निलंबनासारखी कठोर कारवाई होणार? गावकर्‍यांनी संबंधित शिक्षक राम बुसमवार यांना तात्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी केली आहे. शाळा म्हणजे मंदिर, पण येथे शिक्षणाचा सौदा केला जात आहे. अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे, अशा शब्दांत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि जबाबदारीचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. आता प्रशासन केवळ कागदी कारवाईपुरते मर्यादित राहते की प्रत्यक्षात कठोर पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS