हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी किनवट येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी (उपजिल्हाधिकारी) कार्यालयाला हदगाव

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी किनवट येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी (उपजिल्हाधिकारी) कार्यालयाला हदगाव आणि हिमायतनगर तालुके जोडण्यास तीव्र विरोध दर्शवल्याने किनवट-माहूर मतदारसंघातील जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. खासदार आष्टीकर हे संपूर्ण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत की फक्त हदगाव-हिमायतनगरचे? असा खोचक सवाल आता त्रस्त नागरिक आणि मतदार विचारू लागले आहेत.
खासदार आष्टीकर यांनी नांदेड जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. हदगाव-हिमायतनगरच्या जनतेला किनवटला येणे गैरसोयीचे ठरेल, असा पुळका खासदारांना आला असला, तरी याच मतदारसंघाचा भाग असलेल्या किनवट आणि माहूरच्या जनतेच्या हक्काचे काय? हा प्रश्न त्यांनी सोयीस्करपणे बाजूला ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत किनवट-माहूरच्या मतदारांनीही आष्टीकरांना भरघोस मतदान केले होते, मग आता विकासाच्या आणि प्रशासकीय सोयीच्या बाबतीत किनवटवर हा अन्याय का, असा थेट आणि टोकाचा सवाल जनतेमधून केला जात आहे. पत्रात खासदारांनी म्हटले आहे की, हदगाव-हिमायतनगरच्या नागरिकांना नांदेड जवळ पडते. जर सर्व कामांसाठी नांदेडच सोयीचे आहे, तर मग संपूर्ण जिल्ह्याचा कारभार नांदेडवरूनच चालवावा, असा उपरोधिक टोला नागरिकांनी लगावला आहे. एका भागाच्या सोयीसाठी दुसर्या भागाच्या हक्काच्या विकासाला खिळ घालण्याचा हा प्रकार लोकप्रतिनिधीला शोभणारा नाही, अशीच चर्चा सध्या चौकाचौकांत रंगत आहे. प्रस्तावित किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला हदगाव-हिमायतनगर भाग न जोडता पूर्ववत व्यवस्था कायम ठेवावी, या खासदारांच्या मागणीमुळे किनवट-माहूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जर खासदारांना किनवट-माहूरच्या जनतेच्या सोयीची आणि हक्काची बीएवढीच चीड असेल, तर आगामी काळात मतदारांनीही त्यांच्याकडे ’दुजाभावाने’ पाहिले तर नवल वाटायला नको, असा गर्भित इशाराही आता नागरिक देऊ लागले आहेत. या पत्रप्रपंचामुळे आष्टीकरांनी स्वतःच आपल्या मतदारसंघातील एका मोठ्या भागाची नाराजी ओढवून घेतली असून, हा वाद आगामी काळात अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS