लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खेरी येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव मालवाहू वाहनाने समो

लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खेरी येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव मालवाहू वाहनाने समोरून येणार्या प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की प्रवासी वाहन अनेक फूट फरफटत गेले आणि त्यातील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले.
ही दुर्घटना सकाळी साडेसातच्या सुमारास पीलीभीत-बस्ती महामार्गावरील अदलीसपूर गावाजवळ घडली. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी अपघातानंतर काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहन लखीमपूरहून सिसैया भागाच्या दिशेने जात होते. त्याच वेळी समोरून येणारे मालवाहू वाहन भरधाव वेगात होते. अचानक नियंत्रण सुटल्याने त्याने प्रवासी वाहनाला समोरासमोर धडक दिली. धडकेनंतर प्रवासी वाहनाचा चक्काचूर झाला. वाहनातील अनेक प्रवासी आसनांमध्ये अडकून पडले होते, तर काहीजण रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि आरोग्य विभागाचे पथक तातडीने दाखल झाले. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिलांसह अनेक पुरुषांचा समावेश आहे. काही मृतदेह गंभीररीत्या चिरडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे मृतांची ओळख पटविण्याचे कामही पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.

COMMENTS