कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती पथकाने (STF) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्य

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती पथकाने (STF) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात या संशयिताने दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घातपात घडवून आणण्याचा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ल्याचा कट रचल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून तपासाला वेग देण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव मोहम्मद हमीम मंडल असे असून, त्याला पूर्व वर्धमान जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. पुढील सखोल चौकशीसाठी त्याला कोलकाता येथे आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास राज्याच्या विशेष कृती पथकामार्फत सुरू असून विविध यंत्रणांसोबत माहितीची देवाणघेवाण केली जात आहे. विशेष कृती पथकाचे वरिष्ठ अधिकारी गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्राथमिक तपासात संशयिताचे पाकिस्तानातील काही सूत्रधारांशी संपर्क असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार तो विविध हालचाली करत होता. या संपर्काचे स्वरूप, आर्थिक व्यवहार आणि संवादाची साधने यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयिताला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवण्याचे आणि जिथे कमी सुरक्षा असेल अशा ठिकाणांची माहिती गोळा करण्याचे काम दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात येत आहे. तसेच, जंतर-मंतरवरील आंदोलनात पोलिसांचा गणवेश घालून प्रवेश करत तिथे गोंधळ, तोडफोड व भीतीचे वातावरण निर्माण करून आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा त्याचा कट होता, असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

COMMENTS