इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात एका पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात आठ पोलिसांसह १४ जणांच

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात एका पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात आठ पोलिसांसह १४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट घडला त्या वेळी जवळच असलेल्या काबल चौकात नागरिकांची दहशतवादाविरोधात शांतता रॅली सुरू होती.
स्वात जिल्हा पोलीस अधिकारी उमर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण काबल पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटजवळ आला असता तेथील पोलिसांनी त्याला संशयावरून अडवून त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या तरुणाने पोलिसांना नकार देत तत्काळ स्वतःला बॉम्बने उडवून दिले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नसून, घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली आहे.
घटनेपूर्वी स्वात परिसरातील नागरिक वाढत्या दहशतवादी घटनांचा निषेध करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. स्वातच्या डोंगराळ भागात दहशतवादी मोकाट फिरत असताना प्रशासन केवळ सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करत असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला होता.
या घटनेनंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी तीव्र दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी आणि राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीज’च्या अहवालानुसार जुलै महिन्यात खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी हल्ल्यांत १५४ जणांचा बळी गेला असून, मृत्यूच्या संख्येत तब्बल १०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२५’ नुसार पाकिस्तान आता जगातील दुसरा सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश बनला आहे.

COMMENTS