नवी दिल्ली : अयोध्यातील राम मंदिराच्या बांधकामादरम्यान कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य प्रमोद

नवी दिल्ली : अयोध्यातील राम मंदिराच्या बांधकामादरम्यान कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य प्रमोद तिवारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंदिर उभारणीच्या प्रक्रियेदरम्यान देणग्या, मौल्यवान धातू तसेच जमिनीच्या व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे पुन्हा एकदा राम मंदिराशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
रविवारी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद तिवारी यांनी मंदिर उभारणीच्या प्रक्रियेत शेकडो कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. मंदिरासाठी भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचा योग्य वापर झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सोने-चांदीसारख्या मौल्यवान वस्तूंच्या व्यवहारांबाबतही संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, मंदिर उभारणीसाठी शिलापूजन सुरू झाल्यापासूनच आर्थिक अनियमिततेचे प्रकार सुरू झाले होते. राम मंदिराचा विषय सातत्याने राजकीय प्रचारासाठी वापरण्यात आला, मात्र प्रत्यक्ष मंदिर बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच गति मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंदिराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पारंपरिक धार्मिक पद्धतीनुसार प्रमुख शंकराचार्यांचा सहभाग अपेक्षित असताना त्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचेही त्यांनी म्हटले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी करण्यात आलेल्या खर्चावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या तयारीसाठी सुमारे ११२ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा करत फुले, आसन व्यवस्था आणि इतर साहित्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात जादा दर आकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

COMMENTS