Homeताज्या बातम्या

पुनर्वसनाशिवाय अतिक्रमण हटविण्यास विरोध; ‘वंचित’चे कर्जत नगरपंचायतला निवेदन, १३ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

कर्जत : शहरातील मुख्य रस्त्यावरील सुमारे ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे पुनर्वसन न करता अतिक्रमण हटविण्याची कारवाई करू नये, अन्यथा

मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा; ‘अंत नही, ये नई शुरुआत है…’ स्टेटसमुळे राजकीय चर्चांना उधाण
HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
कर्जत नगरपंचायतीला कोणी मुख्याधिकारी देता का ?

कर्जत : शहरातील मुख्य रस्त्यावरील सुमारे ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे पुनर्वसन न करता अतिक्रमण हटविण्याची कारवाई करू नये, अन्यथा गुरुवार (दि. १३) सकाळी ११ वाजल्यापासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी, अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी, नगरपंचायत कर्जत यांना सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कर्जत शहरातील मेन रोडवरील दुकाने गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात असून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. शहराचा विकास व्हावा, याला संघटनेचा विरोध नसला तरी पुनर्वसनाशिवाय अतिक्रमण हटविल्यास शेकडो व्यापारी व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल.

संघटनेने प्रशासनाकडे प्रथम नगरपंचायतीच्या मालकीच्या रिकाम्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याची मागणी केली आहे. तसेच जुने ग्रामपंचायत कार्यालय परिसर, जिल्हा परिषद मराठी शाळा मैदान परिसर, तलाठी कार्यालय परिसर, एस.टी. बसस्थानक चौफेर परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह परिसर अशा विविध ठिकाणी विभागनिहाय पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. व्यापारी संकुल पूर्ण होऊन जुन्या दुकानदारांना प्राधान्याने गाळे मिळाल्यानंतरच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे.

प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १३ ऑगस्टपासून नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, तालुकाध्यक्ष दत्ता भालेराव, जिल्हा ज्येष्ठ सल्लागार आप्पा सरोदे, जिल्हा महासचिव तुकाराम पवार, संजय शेलार, जिल्हा संघटक पोपट थोरात, जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, दीपक ससाने, भारत साळवे, अंकुश साळवे, प्रा. दादा समुद्र, भाऊसाहेब जावळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रूपाली आढाव यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग व व्यापार मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपजिल्हा रुग्णालय तसेच संबंधित वरिष्ठ पदाधिकारी व पत्रकारांना पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

COMMENTS