कर्जत : तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट

कर्जत : तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केटमध्ये विकण्यासाठी नेण्याच्या तयारीत असताना एक एकर क्षेत्रातील कांदा अचानक झालेल्या पावसात पूर्णपणे भिजून नष्ट झाला असून या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदा आधीच कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत महादेव तांदळे यांनी मोठा आर्थिक खर्च करून एक एकर कांद्याचे उत्पादन घेतले होते कांदा पूर्णपणे तयार झाला होता कांद्याची काढणी देखील संपली होती मजुरांकडून कांदा काढून शेतामध्ये ठेवला होता. मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या सर्व आशांवर पाणी फेरले. पावसामुळे कांदा पूर्णपणे भिजल्याने तो सडण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
विशेष म्हणजे नुकसान झाल्यानंतरही महसूल विभाग, कृषी विभाग, तलाठी किंवा संबंधित प्रशासनातील कोणताही अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेला नाही, अशी तक्रार शेतकरी महादेव तांदळे यांनी केली आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामा आवश्यक असताना प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहे.
बहिरोबावाडीतील या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की, नुकसान झाल्यानंतर शासन यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत नेमकी कधी पोहोचणार? नैसर्गिक संकटाचा फटका बसलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी पंचनाम्यासाठीही वाट पाहावी लागत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

COMMENTS