Homeताज्या बातम्या

वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी

मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या वादळी वार्‍याने नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभ्या के

कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)
कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
श्रीगोंदा तहसीलसमोर कर्जमाफीविरोधात निदर्शने  



मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या वादळी वार्‍याने नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभ्या केलेल्या केळीच्या बागा काही मिनिटांत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील निवघा येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून राज्य शासनाकडे मध्यप्रदेशच्या धर्तीवर हेक्टरी दोन लाख रुपयांच्या मदतीची जोरदार मागणी केली.
निवघा येथील शेतकरी बळवंत रामराम पवार यांच्या केळी बागेला भेट देत खा. चव्हाण यांनी नुकसानीची प्रत्यक्ष माहिती घेतली. शेतकर्‍यांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. केळी लागवडीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते, मात्र नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे शेकडो एकरांवरील केळी बागांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणारी मर्यादित मदत शेतकर्‍यांना दिलासा देऊ शकत नाही. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये दिल्या जाणार्‍या मदतीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील केळी उत्पादकांनाही विशेष आर्थिक पॅकेज देण्याची गरज असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रांची मागणीही केली. निवघ्यात वादळ झाले, पण हवामान केंद्र बारड येथे आहे. त्यामुळे स्थानिक नुकसानीची अचूक नोंद होत नाही. परिणामी पीकविमा आणि भरपाई मिळवताना शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागतो, असे ते म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकरी बळवंत पवार, संजयराव पवार, दशरथ आऊलवाड, दत्ता पवार, देवानंद पवार आणि संजय नरडिले यांच्याशी चर्चा करून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी कृषी अधिकारी राजकुमारी देशमुख, तलाठी मुळेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत राजेगोरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष  पावडे, काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख, विश्वनाथ पवार, महेश देशमुख आदी उपस्थित होते.
फलोत्पादन मंत्र्यांशी थेट संपर्क
केळी पिकाच्या नुकसानीची दखल घेत काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. मध्यप्रदेशमध्ये नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना हेक्टरी दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनाही विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
वादळाने शेतकर्‍यांच्या आशांवर पाणी फेरले
गतवर्षीप्रमाणे यंदाही केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा केळीला चांगला बाजारभाव मिळत असतानाच वादळाने शेतकर्‍यांच्या आशांवर पाणी फेरले. त्यामुळे मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने केळी उत्पादकांना हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत द्यावी.
– खा. रवींद्र चव्हाण, खासदार, नांदेड

COMMENTS