संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यामधून आवाज बुलंद करताना त्यांच्या हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती

संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यामधून आवाज बुलंद करताना त्यांच्या हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती केली. त्यांनी मानवता व समतेसाठी नेहमी आवाज उठवला. त्यांचे विचार हे सदैव प्रेरणादायी असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर साकारण्यात येणार असल्याचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.
संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनाही अभिवादन करण्यात आले.
यावेळी मातंग एकता आंदोलनाचे अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर राक्षे, नगरसेवक गजेंद्र अभंग, प्रा. बाबा खरात, नितीन अभंग, संतोष गायकवाड, उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील, संदीप आव्हाड, राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, सचिन शेलार, विजय आव्हाड, देवेंद्र साळवे, बाळासाहेब गायकवाड आणि काँग्रेस सेवादलाचे जीवन पांचारिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयातही अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे पुढे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे मोठे योगदान राहिले आहे. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सतत संघर्ष केला व साहित्यामधून क्रांतीज्योत पेटवली. आजच्या काळात मानवता हा एकच धर्म मानून तो जोपासण्यासाठी आपण काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘या’ महापुरुषांचे उभे राहणार पुतळे व स्मारके: संगमनेर शहरामध्ये बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, तसेच महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. याचसोबत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर उभारले जाणार असून यासाठी नगरपालिकेच्या वतीने जागाही निश्चित करण्यात आली असल्याची माहिती डॉ. तांबे यांनी दिली.

COMMENTS