Homeकृषी

मृग नक्षत्र कोरडे; बीड जिल्ह्यात शेतकरी हवालदिल! कापूस, सोयाबीन पिकांवर पावसाअभावी संकट

बीड: मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले असून, कापूस, सोयाबीन तसेच इतर खरीप पिकांवर मोठे

बीड शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न पुन्हा सभागृहात; २० दिवसांआड येणारे पाणी २ दिवसांवर आणण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी महावितरणला वर्ग करण्याची आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत महिला आणि भूमिहीनांनाही लाभ; राज्यात नवीन न्यायालयांना मंजुरी
शेवगाव नगर परिषद कार्यालयाच्या नव्या वास्तूचे लोकार्पण; मुंढे- लांडे एकत्र आल्याने राजकारणात नवी समीकरणे? बहुतेक नगरसेवकांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

बीड: मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले असून, कापूस, सोयाबीन तसेच इतर खरीप पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली असून ग्रामीण भागात कमालीचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीड जिल्ह्यात सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकर्‍यांनी कापूस, सोयाबीन व इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ पाठ फिरवल्याने पिकांची उगवण क्षमता धोक्यात आली आहे. अनेक शेतकर्‍यांसमोर आता दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले असून, वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीड जिल्हा हा मुख्यत्वे कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो, मात्र पावसातील खंड आणि उशिरा होणार्‍या लागवडीमुळे यंदा उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते, तर यंदा सुरुवातीलाच पावसाअभावी विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजाची खरी गरज असलेला पाऊस न झाल्याने अनेक शेतशिवार ओसाड दिसू लागले आहेत. दरम्यान, दि. २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला सुरुवात झाली असून, या नक्षत्रात तरी चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

छोटे जलसाठे कोरडे; पाण्याचा उपसा थांबविण्याची मागणी

पाऊस न झाल्यास बीड जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष गायके राजू यांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील मोठी धरणे वगळता अनेक छोटे जलसाठे १५ टक्क्यांपासून थेट शून्य टक्के पातळीवर आले आहेत. त्यामुळे उर्वरित तलावांमधून शेती व इतर कामांसाठी पाण्याचा उपसा तात्काळ थांबविण्याचे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गायके राजू यांनी केली आहे.

COMMENTS