श्रीगोंदा: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच प्रलंबित कायदेशीर प्रकरणांचा जलद निपटारा करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक सुद

श्रीगोंदा: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच प्रलंबित कायदेशीर प्रकरणांचा जलद निपटारा करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने गेल्या १५ दिवसांपासून ‘अकस्मात मृत्यू निर्गती मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत २०२० ते २०२६ या कालावधीतील प्रलंबित असलेल्या २३१ अकस्मात मृत्यू प्रकरणांपैकी तब्बल १४६ प्रकरणांची यशस्वीपणे निर्गती करण्यात आली आहे.
अनेक कारणांमुळे अकस्मात मृत्यूच्या नोंदींचा तपास वर्षानुवर्षे प्रलंबित राहतो. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळण्यास विलंब होतो, तसेच विमा दावे आणि इतर कायदेशीर प्रक्रिया अडकून पडतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रलंबित प्रकरणांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली.
मोहिमेदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व प्रलंबित प्रकरणांचा सखोल आढावा घेत तपासाला गती दिली. प्रलंबित शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) अहवाल तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (FSL) अहवाल संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने प्राप्त करण्यात आले. अनेक प्रकरणांमध्ये मृतांच्या वारसांना व नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून आवश्यक कागदपत्रे संकलित करण्यात आली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेमुळे प्रलंबित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा होऊन पोलीस दप्तरावरील ताण कमी झाला असून तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले की, “अकस्मात मृत्यूच्या प्रकरणांचा तपास वेळेत पूर्ण होणे हे पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे.” तसेच ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून उर्वरित सर्व प्रलंबित प्रकरणांची निर्गती कालबद्ध पद्धतीने करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सदर मोहीम पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार शिरसागर यांच्या देखरेखीखाली यशस्वीरित्या राबविण्यात आली.

COMMENTS