Homeताज्या बातम्या

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी समाजाने पुढे यावे; सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांचे आवाहन

सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे बीड: जिल्ह्यात १५ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत समग्र शिक्षण अभियानांतर्गत शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित

मरखेल पोलिसांची मोठी कामगिरी; १ लाख ५७ हजारांचे ७ चोरीचे मोबाईल हस्तगत करून मालकांना केले परत
नेकनूरमधील दर्गा कॉलनीसह विविध वसाहतींच्या मूलभूत सुविधांसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजमाता जिजाऊ पतसंस्थेकडून सत्कार

सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे

बीड: जिल्ह्यात १५ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत समग्र शिक्षण अभियानांतर्गत शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे विशेष सर्वेक्षण राबविण्यात येत असून या मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केले आहे. आपल्या गावात एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी शपथ बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावी, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

ढाकणे यांनी नागरिकांना आवाहन केले की, आपल्या गावात, वाड्या-वस्त्यांवर किंवा परिसरात शाळेत न जाणारे, सतत अनुपस्थित राहणारे किंवा स्थलांतरित कुटुंबातील बालक आढळल्यास त्याची माहिती तात्काळ संबंधित शाळा, ग्रामपंचायत, शिक्षक किंवा शिक्षण विभागाला द्यावी. या मोहिमेत शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, युवक मंडळे, महिला बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. विशेषतः ऊसतोड कामगार व इतर स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

“शिक्षण हा प्रत्येक बालकाचा घटनात्मक आणि मूलभूत हक्क आहे. आर्थिक अडचणी, स्थलांतर, ऊसतोड मजुरी किंवा इतर सामाजिक परिस्थितीमुळे अनेक मुले शाळेपासून दूर जातात. अशा प्रत्येक बालकाचा शोध घेऊन त्याला पुन्हा शाळेत दाखल करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजाचेही सामूहिक कर्तव्य आहे,” असे ढाकणे म्हणाले.

जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शाळाबाह्य मुलांची अचूक नोंद होऊन त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी ब्रिज कोर्स, विशेष प्रवेश मोहीम, शालेय साहित्य व शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS