बीड : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी पुरेशा आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांना मोठ्य

बीड : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी पुरेशा आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सौ. संगीता हरिश्चंद्र ठोसर यांनी नगर परिषदेच्या अध्यक्षा प्रेमलता पारवे आणि मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना निवेदन सादर केले.
यावेळी नंदा बाळू इंगोले, सविता लक्ष्मण बहिरवाळ, यणुबाई बाबासाहेब साबळे, वैशाली आत्माराम बहिरवाळ, मीना शशिकांत दाबा यांच्यासह ग्रामीण भागातून भाजीविक्री, छोटा व्यवसाय तसेच रोजंदारीसाठी शहरात येणार्या अनेक महिलांची उपस्थिती होती. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बीड हे जिल्ह्याचे मुख्य केंद्र असून दररोज शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि खरेदीसाठी हजारो महिला शहरात येतात. मात्र, प्रमुख ठिकाणी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, सुभाष रोड, माळीवेस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, राजीव गांधी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा रुग्णालय परिसर या ठिकाणी तातडीने महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रस्तावित स्वच्छतागृहांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, प्रकाशव्यवस्था, नियमित स्वच्छता आणि देखभाल यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शिवसंग्राम महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS