नांदेड : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने मराठवाड्यातील पक्ष संघटना अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने विविध जिल्ह्यांसाठी नव्या प्र
नांदेड : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने मराठवाड्यातील पक्ष संघटना अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने विविध जिल्ह्यांसाठी नव्या प्रभारींची घोषणा केली आहे. मराठवाड्यातील प्रभावी नेत्यांना स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्याची जबाबदारी दिल्यामुळे ते या प्रभारी पदाला किती न्याय देतील हे येणारा काळ ठरवणार आहे.
बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांची जबाबदारी अनुभवी नेत्यांकडे सोपविण्यात आली आहे. नांदेड शहरासाठी संभाजी पाटील निलंगेकर, नांदेड उत्तरसाठी किरण पाटील, नांदेड दक्षिणसाठी रेखा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परभणी शहरासाठी प्रवीण घुगे, परभणी ग्रामीणसाठी संजय केणेकर, हिंगोलीसाठी संजय कौडगे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जालना महानगरासाठी डॉ. अजित गोपछडे, जालना ग्रामीणसाठी रामराव वडकुते यांची निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरसाठी चैतन्यबापू देशमुख, उत्तरसाठी राहुल लोणीकर, पश्चिमसाठी प्रीतम मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. बीडसाठी सुनील राणे, लातूर शहरासाठी डॉ. भागवत कराड, लातूर ग्रामीणसाठी मनोज पांगारकर तर धाराशिव साठी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नव्या प्रभारींना स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून बूथस्तरापर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या भाजपसाठी निर्णायक मानल्या जात आहेत. भाजपाच्या मराठवाडा माजी संघटनमंत्र्यांना तुलनेने कमी संघटन असणार्या हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असून त्या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. नांदेड महानगराची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे दिल्यामुळे निश्चित संघटनेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. परभणी शहरामध्ये जिल्हाध्यक्ष विरुद्ध परभणी मनपा नगरसेवक असा संघर्ष निर्माण झालेला असल्यामुळे संजय केनकर यांना पक्षाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख यांना छ.संभाजीनगर महानगराची जबाबदारी दिल्यामुळे त्यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. प्रभारी पद देण्यात आलेले अनेक जण पक्षातील आमदार व खासदार असल्यामुळे त्यांना स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात संघटनेचे काम करण्यासाठी वेळ द्यावा लागणार असल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे.

COMMENTS