Homeताज्या बातम्या

राहाता ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव; रुग्णांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

राहाता: येथील ग्रामीण रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याचे कुलर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत आहे

श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी ढोरमले; जातेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
शेतकऱ्यास मारहाण; कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल
बीड शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार भगवान सोनवणे यांच्याकडे

राहाता: येथील ग्रामीण रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याचे कुलर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत. उपचारासाठी येणाऱ्या तसेच दाखल असलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत असल्याने रुग्णांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राहाता हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यासह परिसरातील अनेक गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच शस्त्रक्रिया व प्रसूतीसाठीही अनेक महिला येथे दाखल असतात. मात्र, अशा रुग्णांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

उपचार मोफत, पाणी विकत!

याठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळत असले, तरी तहान भागविण्यासाठी बाहेरून पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत असल्याने “चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय काही वैद्यकीय अधिकारी वेळेत उपलब्ध नसल्याने रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची गंभीर तक्रारही नागरिकांनी केली आहे.

ग्रामीण रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच रुग्णालयातील अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रुग्ण व संतप्त नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची आरो फिल्टर मशीन मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील 40 हून अधिक खेड्यांमधून उपचारासाठी येणाऱ्या शेकडो गरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी बाहेर हॉटेल व दुकानांमध्ये पायपीट करावी लागत आहे. पाणी हा मूलभूत मानवी हक्क असताना शासकीय रुग्णालयातच पाण्याची सोय नसणे, ही अत्यंत लाजिरवाणी व संतापजनक बाब आहे. राहाता ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन बंद पडलेली फिल्टर पाणी मशीन तात्काळ दुरुस्त करून रुग्णांसाठी चोवीस तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा “हंडा मोर्चा व ठिय्या आंदोलन” छेडण्यात येईल.
 – दीपक कसबे, जिल्हा संघटक, वंचित बहुजन आघाडी

COMMENTS