नांदेड : वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न राहता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श समायरा सुप्रित तोष्णीवाल हिच्या वाढदिवसानिमित्त

नांदेड : वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न राहता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श समायरा सुप्रित तोष्णीवाल हिच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमातून घालून देण्यात आला. नांदेड महानगरपालिका शाळेतील इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षा या अत्यंत समकालीन विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी मनपाच्या महिला, बालकल्याण व शिक्षण समितीच्या सभापती सदिच्छा सोनी-पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.
डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, संशोधन आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. एआयच्या माध्यमातून संगणक मानवी विचारपद्धतीचे विश्लेषण करून निर्णय घेण्यास, माहितीचे विश्लेषण करण्यास तसेच विविध समस्या सोडविण्यास सक्षम होत आहेत. भविष्यातील रोजगाराच्या संधी, नावीन्यपूर्ण संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण, नैतिक आणि जबाबदारीने वापर करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
यावेळी सभापती सदिच्छा सोनी-पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देताना इंटरनेटचा सुरक्षित वापर, मजबूत पासवर्ड तयार करण्याची सवय, ओटीपी व वैयक्तिक माहिती कोणालाही न देणे, ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, बनावट संकेतस्थळे, सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल जगात सजग नागरिक म्हणून वावरण्यासाठी सायबर साक्षरता ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास शिक्षण अधिकारी प्रवीणा मांदळे, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंतराव चव्हाण, मुख्याध्यापक कल्याण, सेवानिवृत्त शिक्षक मुस्तापुरे, एलआयसीचे सेवानिवृत्त विकास अधिकारी परमानंद तोष्णीवाल, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुप्रित तोष्णीवाल व समीक्षा तोष्णीवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. ज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाविषयी कुतूहल निर्माण केले, तसेच डिजिटल युगात सुरक्षित, जबाबदार आणि सक्षम नागरिक होण्यासाठी आवश्यक असलेली जाणीवही विकसित केली. वाढदिवसासारखा वैयक्तिक आनंदाचा दिवस समाजहित आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी समर्पित करण्याच्या तोष्णीवाल कुटुंबाच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

COMMENTS