Homeताज्या बातम्या

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले; 10 ऑगस्टपर्यंत जागा खाली करण्याचे निर्देश

भोकर : भोकर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह शहरातील विविध भागांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. अतिक्रम

देशात पेपरफुटीविरोधात कठोर कायदा लागू; राष्ट्रपतींची मंजुरी, सार्वजनिक परीक्षांतील गैरप्रकारांवर कठोर शिक्षेची तरतूद
लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर; खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावरून सभागृहात मोठा गदारोळ
अंबाजोगाईत अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन

भोकर : भोकर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह शहरातील विविध भागांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. अतिक्रमणधारकांना जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, भोकर पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत अतिक्रमण हटविण्यासाठी सोमवार, दि. 10 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भोकर शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांच्या कडेला तसेच बाजारपेठेच्या परिसरात शेड, पत्र्याचे बांधकाम, दुकानदारांकडून वाढविण्यात आलेली जागा आणि अन्य स्वरूपातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, पादचारी आणि वाहनचालकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित कायद्यानुसार तसेच शासन निर्णय, दि. 23 जानेवारी 2025 नुसार अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच पंचायत समिती, भोकर यांच्या वतीने संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाकडून सुरुवातीला संबंधित बांधकामे, शेड व अन्य अतिक्रमणे 24 तासांच्या आत स्वतःहून हटवावीत, अशा स्वरूपाच्या नोटिसा दुकानदारांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संबंधित दुकानदारांची बैठक भोकर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी सोमवार, दि. 10 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती आहे. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण स्वतःहून न हटविल्यास प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारकांची राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या भोकर शहरातील रस्ते आणि प्रमुख चौक आता मोकळे होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या कारवाईची धास्ती घेत काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून शेड व अन्य अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्याचेही दिसून येत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप अतिक्रमणे कायम असल्याने प्रशासन पुढील टप्प्यात नेमकी काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. भोकर शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. प्रशासनाने नोटिसा बजावून कारवाईची प्रक्रिया सुरू केली असली तरी मुदत संपल्यानंतर प्रत्यक्षात किती अतिक्रमणे हटविली जातात आणि कारवाई राजकीय प्रभावापासून अलिप्त राहते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेला अल्टिमेटम केवळ कागदावरच राहणार की शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार, हे दि. 10 ऑगस्टनंतर स्पष्ट होणार आहे.

COMMENTS