किनवट : किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या राजकीय आणि प्रशासकीय हायव्होल्टेज ड्रामा सुरू असून ८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विशेष सभेत अखेर मोठा ब
किनवट : किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या राजकीय आणि प्रशासकीय हायव्होल्टेज ड्रामा सुरू असून ८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विशेष सभेत अखेर मोठा ब्लास्ट झाला. तब्बल २.५२ कोटींच्या मुदत ठेवींची बेकायदेशीर परस्पर उचल करून खासगी कामासाठी वापर केल्याच्या गंभीर आरोपावरून बाजार समितीचे सचिव रवींद्र राठोड यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पणन संचालकांच्या चाबकामुळे पार पडलेल्या या बैठकीत एकूण तीन मुख्य आणि खळबळजनक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सचिव रवींद्र राठोड यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड चालवून त्यांच्या जागी विकल रंगनेनीवार यांची प्रभारी सचिव म्हणून तडकाफडकी नियुक्ती झाली. २ कोटी ५२ लाख ८६ हजार ६७५ रुपयांच्या या अथांग गैरव्यवहाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सोपान केंद्रे, श्रीराम कांदे आणि प्रल्हाद सातव या तीन संचालकांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
‘मी तर इतर संचालकांना बरखास्तच केले आहे’ असा दावा करणारे सभापती गजानन मुंडे स्वतः या सभेला अनुपस्थित राहिले. सभापती मुंडे यांनी दोन महिला संचालकांच्या तक्रारीची ढाल करून इतर संचालकांवर कारवाईचा दावा केला होता. पण सभेच्या दिवशीच महिला संचालक कुसुम गणपत मुंडे व अनुसया मनोहर पेंदोर यांनी थेट माध्यमांसमोर येत सभापतींचा बुरखा फाडला. सभापती मुंडे यांनी आमच्या नावे खोटी पत्रे अन् अर्ज तयार करून प्रशासनाची आणि सर्वांची दिशाभूल केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या खोटारडेपणाविरोधात सहाय्यक उपनिबंधकांकडे (किनवट) थेट लेखी तक्रारही धडकली आहे.
सभापतींच्या गैरहजेरीत अन् कोरमच्या फुल्ल ताकदीवर उपसभापती राहुल गेमसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा रंगली. या बैठकीला तब्बल १७ संचालक ठाण मांडून उपस्थित होते, तर दुसरीकडे सभापती गजानन मुंडे मात्र एकाकी अन् अनुपस्थित दिसले. लाखोंच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या घामाच्या पैशांवर मारलेला हा डाका आता उघडकीस आल्याने तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आता त्रि-सदस्यीय समितीच्या चौकशीत आणखी कोणाकोणाचे चेहरे उघडे पडतात, याकडे संपूर्ण किनवट तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS