भोकर : भोकर शहरासह तालुक्यात अवैध दारूविक्रीला ऊत आल्याच्या तक्रारी होत असतानाच आता त्याचे पडसाद सार्वजनिक ठिकाणीही दिसून येत आहेत. भोकर शहरातील

भोकर : भोकर शहरासह तालुक्यात अवैध दारूविक्रीला ऊत आल्याच्या तक्रारी होत असतानाच आता त्याचे पडसाद सार्वजनिक ठिकाणीही दिसून येत आहेत. भोकर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय नूतन प्राथमिक शाळा (पीएमश्री) च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच शालेय वेळेत काही व्यक्ती देशी दारूचे सेवन करून ठिय्या मांडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शाळेच्या गेटसमोरच दारू पिऊन बसणे, झोपणे अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुलांसमोर सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवनाचे प्रकार घडत असल्याने त्याचा त्यांच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे. भोकर शहरासह ग्रामीण भागातही अवैध देशी दारूविक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. संबंधित विभागांकडून प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ग्रामीण भागातही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवनाचे प्रकार होत असल्याची चर्चा आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच मद्यसेवनाचा प्रकार घडत असताना संबंधित यंत्रणेचे लक्ष का जात नाही, असा संतप्त सवाल पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळा परिसरात मद्यसेवन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, तसेच भोकर शहर व तालुक्यातील अवैध दारूविक्रीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांतून होत आहे. शाळेच्या गेटसमोरच दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आणखी किती पुरावे हवेत? असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.

COMMENTS