बीड: ‘गुरुवंदन’ राष्ट्रीय कार्यशाळेतून शिक्षणासंबंधी मंथन होणे गरजेचे आहे. प्रत्येक प्राध्यापकाने आत्मपरीक्षण करावे आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या

बीड: ‘गुरुवंदन’ राष्ट्रीय कार्यशाळेतून शिक्षणासंबंधी मंथन होणे गरजेचे आहे. प्रत्येक प्राध्यापकाने आत्मपरीक्षण करावे आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी. भारतीय ज्ञानपरंपरा अत्यंत उत्तुंग असून आत्मभान व आत्मचिंतन जपावे. आपल्या ज्ञानपरंपरेची मूल्ये जपत शिक्षणाची वाटचाल व्हावी, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, बीड येथील सौ. के. एस. के. महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय ज्ञानपरंपरा, गुरुशक्ती २०४७ – विकसित भारत : शैक्षणिक नेतृत्वातून राष्ट्रनिर्माण’ या विषयावरील ‘गुरुवंदन २०२६’ राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी (दि. २९) पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. फुलारी बोलत होते.
व्यासपीठावर स्वागताध्यक्ष तथा नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय स्वामी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. गजानन सानप, निमंत्रक प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, विद्यापीठ विकास मंचाचे सचिव परमेश्वर हसबे, आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाचे संचालक प्रा. डॉ. अश्विन रांजणीकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. डॉ. फुलारी म्हणाले की, भारतीय ज्ञानपरंपरा ही प्राचीन काळापासून समृद्ध आहे. मात्र आज शिक्षणाबाबतची संवेदनशीलता कमी होत चालली आहे. शिक्षकांनी वर्गात जाण्यापूर्वी विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करण्यासाठी नियमित उपस्थित राहावे, असे मत त्यांनी मांडले.
नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी: डॉ. योगेश क्षीरसागर
डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, भारतीय ज्ञानपरंपरेमुळे भारताला संस्कारशील शिक्षणाची समृद्ध परंपरा लाभली आहे. परंपरागत शिक्षण, शेती, योग, आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्र यांचा समन्वय साधत नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत असून त्याचा आगामी पिढीला मोठा लाभ होईल.
विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या हितासाठी मंच: परमेश्वर हसबे
विद्यापीठ विकास मंचाचे सचिव परमेश्वर हसबे म्हणाले की, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून भारतीय शैक्षणिक कार्य पुढे नेले जात आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून युवकांच्या मनात चांगले विचार विकसित करण्याची गरज आहे.
भारतीय गुरु-शिष्य परंपरा जगात श्रेष्ठ: संजय स्वामी
शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय स्वामी यांनी बीजभाषणात सांगितले की, भारतीय गुरु-शिष्य परंपरा जगामध्ये श्रेष्ठ असून समाजात परिवर्तन घडविणारा युवा भारत घडविणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी नेहमी सक्रिय राहून सक्षम युवा भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. सचिन कंदले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रुपाली कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी मानले. यावेळी विद्यापीठाचे सदस्य तसेच ४७५ हून अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधक उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षणतज्ज्ञांचा गौरव
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांचा गुरुपौर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. दीपाताई क्षीरसागर, डॉ. मुनीष शर्मा, डॉ. अशोक मोहेकर, डॉ. चंद्रशेखर राव, डॉ. वसंत सानप आणि विनायकराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

COMMENTS