Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ते विकासाच्या कामावर ‘खंडणीची सावली’; तरोडा बुद्रुकमध्ये कथित नगरसेवकगिरीचा नवा चेहरा?

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या तरोडा बुद्रुक प्रभागातील विकासनगर येथे सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाभोवती आता विकासा

माजलगावात विकासाच्या नावाखाली उघड ‘डाका’;सुवर्ण जयंती योजना की भ्रष्टाचाराचा बाजार? : नवीदोद्दीन सिद्दिकी
राष्ट्रीय महामार्गांवरील भेगांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले; प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह – डॉ. गणेश ढवळे यांची टीका
कोट्यवधींची ‘केमिकल’ डागडुजी फेल; जिल्हा परिषद इमारत मृत्यूच्या उंबरठ्यावर!भेगांनी पोखरलेल्या इमारतीत कर्मचारी कामावर; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप
Nanded Waghala Municipal Corporation elections:भाजपामध्ये धामधूम ,  काँग्रेसमध्ये सामसूम !

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या तरोडा बुद्रुक प्रभागातील विकासनगर येथे सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाभोवती आता विकासापेक्षा वादाचे व तोडपाणी करण्याचे ढग दाटू लागल्याची चर्चा आहे. प्रशासकांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या या कामाला स्थानिक नागरिकांकडून सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. कारण काम करणारी व्यक्ती ही याच परिसरातील रहिवासी असल्याने रस्त्याचे काम दर्जेदार, टिकाऊ आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या कामावर कथित खंडणीच्या मागण्यांची सावली पडल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या दोन तथाकथित अन-अनुभवी नगरसेवकांनी संबंधित कामाच्या ठिकाणी भेट देत सुरुवातीला तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. कंत्राटदाराने ही मागणी फेटाळल्यानंतर रक्कम कमी करून तीन लाखांवर आणल्याचेही सांगितले जाते. मात्र त्यालाही नकार मिळाल्यानंतर महापालिकेतून तुझे बिल कसे निघते ते आम्ही पाहतो अशा शब्दांत दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  ही बाब केवळ पैशांच्या व्यवहारापुरती मर्यादित न राहता पुढे उघड वादात परिवर्तित झाल्याचे समजते. शाब्दिक चकमकीनंतर धक्काबुक्की झाली आणि प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू आहे. यानंतर हे संपूर्ण प्रकरण भाग्यनगर पोलीस ठाण्यापर्यंत गेले असून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया झाल्याचे कळते. अधिकृत पातळीवर पोलिसांकडून माहिती जाहीर झालेली नसली तरी या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एका प्रमुख पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी हे प्रकरण पोलिसांत गुन्हा नोंद होण्यापूर्वीच मिटविण्यासाठी हालचाली केल्याचेही बोलले जात आहे.  जर हे खरे असेल, तर ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे. कारण लोकप्रतिनिधींवर आरोप असताना त्यांना कायद्यापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न लोकशाहीला धक्का देणारा ठरू शकतो. स्थानिक नागरिकांमध्ये या कथित प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विकासकामे म्हणजे जनतेच्या पैशातून उभारला जाणारा सार्वजनिक विश्वास असतो. त्यावर कमिशन, दबाव, खंडणी आणि बिल अडविण्याच्या धमक्या यांची सावली पडू लागली, तर विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि गती या तिन्ही गोष्टी धोक्यात येतात. मतं मागताना विकास, निवडून आल्यानंतर वसुली अशी टीका नागरिकांतून ऐकू येत आहे. तरोडा बुद्रुकमध्ये तर एका अन अनुभवी नगरसेवकाला त्याच्याच समर्थकांनी गावकर्‍यांसमोर सुनावल्याची चर्चा चहाटळ मंडळांपासून हॉटेल, पानटपर्‍या आणि सलूनपर्यंत रंगू लागली आहे. ही चर्चा खरी असो वा अफवा, पण लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला तडा गेला आहे, हे निश्चित. महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सत्य बाहेर आणणे आवश्यक आहे. अन्यथा रस्ते काँक्रीटचे होतील, पण लोकशाहीचा पाया मात्र कमकुवत स्तंभावर उभा राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS