किनवट : सामाजिक ऐक्याचे आणि आस्थेचे प्रतीक मानले जाणारे प्रभाग क्रमांक 2 (बुद्ध विहार परिसर) येथील समाजमंदिर सध्या निकृष्ट बांधकामाच्या सावटाखाली
किनवट : सामाजिक ऐक्याचे आणि आस्थेचे प्रतीक मानले जाणारे प्रभाग क्रमांक 2 (बुद्ध विहार परिसर) येथील समाजमंदिर सध्या निकृष्ट बांधकामाच्या सावटाखाली सापडले आहे. सुरक्षेचा भक्कम पाया रचण्याऐवजी दुर्लक्षाचा स्लॅब रचला जात आहे, असा गंभीर आरोप करत नांदेड जिल्हा सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष ड. एम. यू. सर्पे यांनी या संपूर्ण बांधकामाच्या तांत्रिक चौकशीची आक्रमक मागणी केली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत (2023-24) सुमारे 1 कोटी 40 लाख 68 हजार 900 रुपये खर्चाच्या या भव्य प्रकल्पाची पायाभरणी झाली. 5 जून 2024 रोजी (कार्यादेश क्र. 1051/2024) 180 दिवसांच्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे कंत्राट व्यंकटराव नरसिंगराव माडपेल्लीवार यांना देण्यात आले. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते. अॅड. सर्पे यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनुसार, इमारतीचा पाया आणि पहिला स्लॅब कमालीचा अशक्त आणि निकृष्ट दर्जाचा झाला आहे. असे असतानाही त्यावर दुसर्या मजल्याचा अवास्तव भार पेलण्याचा अट्टहास सुरू आहे. भविष्यात येथे एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ड. सर्पे यांनी मार्च महिन्यातच नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, प्रशासकीय ढिम्म कारभारामुळे हे निवेदन अद्याप धूळ खात पडून आहे. सदर काम तत्काळ स्थगित करून तज्ज्ञ समितीमार्फत तांत्रिक तपासणी करण्यात यावी. दोषांवर शिक्कामोर्तब झाल्यास संपूर्ण बांधकाम पाडून नव्याने दर्जेदार उभारणी करावी आणि दोषी कंत्राटदार व अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हावी.अशी मागणी ड. एम. यू. सर्पे यांनी केली आहे.

COMMENTS