Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाजावाजा न करता एलसीबीत बदल; अतुल भोसले यांच्या खांद्यावर गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारी

नांदेड : गेल्या काही दिवसांत नांदेड शहरात अवघ्या 72 तासांत पाच खुनांच्या घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असताना जिल्हा पोलीस दलात मोठी प्रशास

पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा
पालकमंत्री पोलीस प्रशासनाचे कान उपटायला आले होते की मोबाईल वाटप सोहळ्यासाठी? नांदेडकरांचा संतप्त सवालनिष्क्रिय पालकमंत्री, स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन यामधून जनतेची निव्वळ करमणूक
भाजपच्या ‘रामराज्यात’ तरोडा, सांगवी अवैध धंदे व विजेचा लपंडाव यामुळे बेजार;  स्वतःच्याच मंडळ अध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर

नांदेड : गेल्या काही दिवसांत नांदेड शहरात अवघ्या 72 तासांत पाच खुनांच्या घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असताना जिल्हा पोलीस दलात मोठी प्रशासकीय हालचाल झाली आहे. कोणताही गाजावाजा न करता स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी अतुल भोसले यांनी गुरुवारी रात्री गुप्तपणे पदभार स्वीकारला. या बदलामुळे पोलीस वर्तुळात तसेच इच्छुक अधिकार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नांदेडमधील वाढती गुन्हेगारी, टोळ्यांचे बळावलेले जाळे, अवैध व्यवसायांचा फैलाव आणि सलग घडलेल्या गंभीर घटनांमुळे जिल्हा पोलीस प्रशासनावर दबाव वाढला होता. त्यामुळे पोलीस विभागात लवकरच मोठे बदल होतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र या बदलाची अंमलबजावणी इतक्या शांतपणे होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या प्रभावी कारकीर्दीला यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला. त्यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला. विशेषतः 4 एप्रिलनंतर जिल्ह्याचे नाव राज्यभर चर्चेत आले असताना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आली. त्या मोहिमेत तत्कालीन एलसीबी प्रमुख उदय खंडेराय व त्यांच्या पथकाची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पाडण्यातही पोलीस यंत्रणेने यश मिळवले होते. तरीही गुन्हेगारीविरोधातील पुढील टप्प्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून दिले जात होते. दरम्यान, 18 व 19 एप्रिल रोजी पालकमंत्री अतुल सावे यांच्या नांदेड दौर्‍यात पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी बिलोली येथे कार्यरत असलेल्या अतुल भोसले यांच्या धाडसी कारवायांची विशेष दखल घेतल्याची चर्चा आहे. बिलोली परिसरात अवैध वाळू उपशावर त्यांनी केलेल्या मोहिमेमुळे त्यांचे नाव वरिष्ठांच्या नजरेत भरले होते. विशेष म्हणजे, काही कारवायांमध्ये जप्त वाहनांबाबत वाद निर्माण झाले होते. तरीही भोसले यांनी स्थानिक पातळीवर दबावाला न जुमानता कारवाईची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांच्याकडे एलसीबीची सूत्रे सोपविण्याचा निर्णय अचानक झाला, अशी माहिती पोलीस वर्तुळातून समोर येत आहे. अतुल भोसले हे गेल्या वर्षभरापासून स्थानिक गुन्हे शाखेत येण्यासाठी प्रयत्नशील होते, अशी चर्चा होती. मात्र 23 एप्रिलच्या रात्री त्यांनी शांतपणे पदभार स्वीकारताच अनेक इच्छुक अधिकार्‍यांचा हिरमोड झाला. एलसीबीसारख्या प्रभावी शाखेवर अनेकांची नजर होती; पण अखेर शर्यतीत भोसले यांनी बाजी मारली. आता नव्या पोलीस निरीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. जिल्ह्यातील मटका-सट्टेबाजी, अवैध क्लब, वाळू माफिया, संघटित गुन्हेगारी टोळ्या, खंडणीचे प्रकार, शस्त्रसाठा आणि शहरातील वाढते दहशतीचे वातावरण यावर कठोर लगाम लावण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. एलसीबी प्रमुखपद हे केवळ खुर्ची नसून जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे केंद्रबिंदू मानले जाते. त्यामुळे अतुल भोसले यांची नियुक्ती ही केवळ बदली नसून नांदेडच्या गुन्हेगारीविरोधातील नव्या मोहिमेची सुरुवात मानली जात आहे. आता घोषणांपेक्षा कारवाई, आणि चर्चेपेक्षा निकाल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS