नांदेड : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. तालुक्यातील अनेक गाव

नांदेड : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. तालुक्यातील अनेक गावांसह जाकापूर तांडा येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी मैलोगणती पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने गावकर्यांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे.
जाकापूर तांड्यात सध्या पाण्याचा कोणताही शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. तांड्यातील एकमेव विहिरीनेही तळ गाठल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. थोडेफार पाणी मिळावे या आशेने महिलांसह लहान मुले आणि वृद्ध नागरिक रात्री उशिरापर्यंत विहिरीजवळ थांबत असल्याचे वास्तव समोर आले आहे. काही वेळा विहिरीत पाणी साचण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे. पहाटेपासून पाण्याच्या शोधात भटकंती सुरू होत असून, दिवसातील बहुतांश वेळ पाणी भरण्यातच जात असल्याची व्यथा स्थानिक महिलांनी व्यक्त केली. घरातील इतर कामे, मजुरी किंवा शेतीची कामे बाजूला ठेवून केवळ पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होत आहे. काही कुटुंबांना दोन ते तीन दिवस अंघोळीसाठीही पाणी मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. मानवांसह पाळीव जनावरांचाही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बैल, गायी, म्हशी यांना पाणी मिळत नसल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेक शेतकर्यांनी जनावरांसाठी दूरवरून पाणी आणण्याची वेळ आल्याचे सांगितले. उन्हाच्या तीव्र झळांमुळे आधीच जनावरे त्रस्त असताना पाण्याअभावी त्यांचे हाल होत असल्याचे चित्र गावांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, गावकर्यांनी प्रशासनाकडे तातडीने पाणीटँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. आम्हाला कसंही करून पाणी उपलब्ध करून द्या. पाण्यावाचून जगणं कठीण झालं आहे, अशी आर्त विनंती एका स्थानिक महिलेने केली. ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे निवेदने दिल्याचा दावा केला असून, अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. भोकर तालुक्यातील वाढती पाणीटंचाई ही केवळ एका गावाची समस्या नसून ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापनाच्या अपयशाचे गंभीर वास्तव समोर आणणारी आहे. आगामी काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे पुनर्भरण आणि पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS