बीड : शेतकरी कुटुंबावर झालेल्या अन्यायाची चौकशी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प

बीड : शेतकरी कुटुंबावर झालेल्या अन्यायाची चौकशी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेषराव वीर हे गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित प्रकरणात तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी प्रमुख मागणी शेषराव वीर यांनी केली आहे. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शेतकरी कुटुंबाशी संबंधित जमीन व रस्त्याच्या वादामध्ये प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तहसीलदारांनी यापूर्वी आदेश दिलेले असतानाही त्याची अंमलबजावणी करताना नियमांचे पालन झाले का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित मंडळ अधिकार्यांनी मनमानी पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भूमिअभिलेख विभागाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता शेतजमिनीशी संबंधित कारवाई करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी कुटुंबातील महिला, पुरुष आणि लहान मुलासोबत मारहाण झाल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वीर यांनी केली आहे.

COMMENTS