पाथर्डी: "गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारा शिक्षक नव्हे; तर विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा, व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि माणूसपण जागवणारा दीपस्

पाथर्डी: “गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारा शिक्षक नव्हे; तर विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा, व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि माणूसपण जागवणारा दीपस्तंभ होय,” असे प्रतिपादन पार्थ नगरीचे नगराध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी येथे विविध उपक्रम आयोजित करून गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले की, भारताची ओळख जगाला विविधतेने नटलेली संस्कृती, समृद्ध अध्यात्म, महान संतपरंपरा आणि हजारो वर्षांची ज्ञानपरंपरा हीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. या ज्ञानपरंपरेचा आत्मा जर कोणामध्ये वसला असेल, तर तो ‘गुरु’ या संकल्पनेत आहे. भारतीय संस्कृतीने गुरुचे स्थान अत्यंत उच्च मानले आहे. म्हणूनच आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे.
एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याला फक्त परीक्षेतील गुणांसाठी तयार करत नाही, तर त्याला आयुष्याच्या परीक्षेसाठी घडवतो. अनेकदा विद्यार्थ्यांच्या चुकांमागे दडलेली क्षमता शिक्षकांनाच दिसते. अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्याच्या पाठीवर विश्वासाने ठेवलेला शिक्षकाचा हात त्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. शिक्षकाचा प्रोत्साहनाचा एक शब्द आणि वेळेवर दिलेला योग्य सल्ला विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो; म्हणूनच शिक्षकांना समाजाचे शिल्पकार म्हटले जाते, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
भावुक वातावरणात पालकांचे पाद्यपूजन
या कार्यक्रमादरम्यान बालवाडी विभागात सर्व विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे पाद्यपूजन करण्याचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या चिमुकल्यांकडून झालेले हे पूजन पाहून उपस्थित सर्व पालक अत्यंत भावुक झाले होते. तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयातील तब्बल ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, अनुलोम संस्थेच्या तालुकाप्रमुख मेघा चिंतामणी, मुख्याध्यापक शरद मेढे, ज्ञानेश्वर गायके, अनुजा कुलकर्णी, संपत घारे, रेश्मा सातपुते, शितल आंधळे यांसह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS