Oplus_16908288 लोणी: "आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळेची भूमिका अत्यंत महत्त

लोणी: “आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून संस्कारक्षम, जबाबदार आणि नेतृत्वक्षम नागरिक घडविण्याचे कार्य शाळा प्रभावीपणे करत असते,” असे प्रतिपादन लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, लोणी येथे आयोजित विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख व्हावी, मतदानाचे महत्त्व समजावे तसेच नेतृत्वगुण आणि जबाबदारीची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने शाळेत प्रथम मतदान प्रक्रिया राबवून विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली होती. निवडून आलेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा याप्रसंगी पार पडला.
समारंभात विद्यालयाचा तसेच कुलाचा ध्वज नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींकडे सन्मानपूर्वक हस्तांतरित करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना बॅज प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्त, पुढाकार, विद्यार्थी हिताचे प्रश्न मांडणे आणि शाळेच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याची शपथ व जबाबदारी स्वीकारली.
हा उपक्रम संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे आणि शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. त्यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन रविंद्र भणगे, अनिल पिंपळे आणि प्रज्ञा कानडे यांनी केले.

COMMENTS