अहिल्यानगर: अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू

अहिल्यानगर: अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिला. सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी असून, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठीच असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नेवासा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियानाच्या शुभारंभप्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, “अधिकारी काम करत नसतील तर आंदोलन करा. तुम्ही महायुतीचे आमदार असलात तरी लोकांच्या प्रश्नांसाठी मागे-पुढे पाहू नका. तुम्ही आंदोलन केले तर मी स्वतः तुमच्यासोबत येईन. माझे वडील पालकमंत्री असले तरी मी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी होईन.” प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे जनतेची कामे करावीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
नेवासा तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराजस्व समाधान शिबीर अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष करण घुले, विविध शासकीय अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील ७,५०० नागरिकांना मिळाला लाभ
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी माहिती दिली की, तालुक्यातील ११ मंडळांमध्ये आयोजित २२ शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ७ हजार ५०० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. डिजिटल सातबारा, वारस नोंद, फेरफार यांसह महसूल व इतर १३ विविध शासकीय विभागांचे स्टॉल एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच तालुक्यात २ हजार ३५ बचत गटांच्या माध्यमातून २५ हजार ५०० महिलांना जोडण्यात आले असून महिला सक्षमीकरणावर अधिक भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमणधारकांच्या प्रश्नावर संयुक्त बैठक
नेवासा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नावर लवकरच संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. तसेच तालुक्यातील सिंचन आणि पाणी नियोजनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचे आमदार लंघे पाटील यांनी कौतुक केले.

COMMENTS