Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

सीबीआयच्या कारवाईने नांदेड हादरले : आरसीसी कोचिंग क्लासेससमोर तगडा पोलीस बंदोबस्त

नांदेड : देशभर गाजत असलेल्या नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात नांदेडच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्याची म

भोकरमधील विद्यार्थ्यांना शिक्षक द्या; अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल-पाटील
नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो नागरिकांचा सहभाग, ‘करो योग रहो निरोग’चा संदेश
शेतकर्‍यांसाठी खरीप पीक स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज चालू; ३१ ऑगस्टपर्यंत संधी


नांदेड : देशभर गाजत असलेल्या नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात नांदेडच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्याची माहिती समोर आल्यानंतर नांदेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मागील पाच दिवसांपासून सीबीआयकडून त्यांची सखोल चौकशी सुरू होती. रविवारी दुपारपासून पुणे येथील सीबीआय कार्यालयात त्यांची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी पहाटे त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आल्याचे समजते. पुढील कारवाईसाठी त्यांना दिल्ली येथील सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे आता पुणे, लातूर आणि नांदेडपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत असून तपास अधिक व्यापक होत चालल्याची चर्चा आहे. नीट परीक्षेच्या केमिस्ट्री विषयाचे पेपर सेटर पी. व्ही. कुलकर्णी, बायोलॉजी विषयाच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे तसेच पुणे येथील ब्युटीशियन मनीषा वाघमारे यांच्या माध्यमातून पेपर फुटीचे जाळे कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्‍नपत्रिका पोहोचविण्याच्या पद्धतीचा तपास सीबीआयकडून सुरू आहे.
दरम्यान, शनिवारी नांदेडमधील कदम कुटुंबीयांचीही सीबीआयने अनेक तास चौकशी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर रविवारी शिवराज मोटेगावकर यांच्या चौकशीला वेग आला आणि अखेर सोमवारी अटकेची कारवाई करण्यात आल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. तपास यंत्रणांकडून अनेक डिजिटल पुरावे, मोबाईल कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदींची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आरसीसी कोचिंग क्लासेससमोर सोमवारी सकाळपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. काही विद्यार्थी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर क्लासेस परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सकाळी नेहमीप्रमाणे हजारो विद्यार्थी क्लासेसमध्ये पोहोचले असता त्यांना अचानक सुट्टी असल्याचे सांगण्यात आले. शहरातील दोन्ही शाखांना कुलूप लावण्यात आल्याचे पाहून विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. नीटसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणार्‍या या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी चिंता व्यक्त केली जात असून, सीबीआयच्या पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नांदेड शहरातील दोन विद्यार्थ्यांना नीटचा लीक झालेला पेपर कोणत्या कोचिंग क्लासेसमधून मिळाला याबाबत सीबीआय चौकशी करत आहे. अटक करण्यात आलेल्या संचालकाच्या कोचिंग क्लासेसमधील कर्मचार्‍यांचा व प्राध्यापकांचा या पेपर फुटीमागे काही हात आहे ? याचीही चौकशी केली जात असल्याची चर्चा शहरात होत आहे. आरसीसी कोचिंग क्लासेस बंद राहिल्यास या कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय ?

COMMENTS